मुंबई : 'मारुती सुझुकी' या वाहन निर्मिती करणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीने स्विफ्ट आणि डिझायरची नवीन मॉडेल्स परत मागवली आहेत. हॅचबॅक आणि सिडान मॉडेल्सच्या एअरबॅग कंट्रोलर युनिटमध्ये बिघाडाच्या शक्यतेमुळे 1279 वाहनं रिकॉल करण्यात आली आहेत.


स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायरच्या मॉडेल्समध्ये एअरबॅग्ज नसल्याची शक्यता आहे. त्यामुळेच कंपनीने या गाड्या परत मागवून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 मे 2018 ते 5 जुलै 2018 या कालावधीत निर्मिती झालेल्या 1 हजार 279 गाड्या रिकॉल केल्या आहेत. यामध्ये 566 नवीन स्विफ्ट आणि 713 नवीन स्विफ्ट डिझायरचा समावेश आहे.

रिकॉल कॅम्पेन अंतर्गत आजपासून (25 जुलै) संबंधित वाहनांच्या मालकांना मारुती सुझुकीच्या डिलरकडून संपर्क साधला जाईल. कारची तपासणी आणि नादुरुस्त पार्ट्सची मोफत रिप्लेसमेंट करुन दिली जाणार आहे. दिल्लीतील ऑटो एक्स्पोमध्ये फेब्रुवारी महिन्यात नवीन स्विफ्ट, तर गेल्या वर्षी नवीन स्विफ्ट डिझायर लाँच झाली होती.

तुमच्या गाडीतील बिघाड कसा तपासाल?

मारुती सुझुकीच्या वेबसाईटवर जा. चेसिस नंबरमध्ये 14 डिजीटचा अल्फा न्यूमरिक क्रमांक टाका. नवीन स्विफ्ट मालकांनी MBH आणि नवीन डिझायर मालकांनी MA3 नंबर टाकावा. चेसिस नंबरमध्ये तुम्हाला वेहिकल आयडी प्लेट आणि वेहिकल/रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स दिसतील. मारुती सुझुकीच्या वर्कशॉपमध्ये जाऊनही ग्राहक याविषयी माहिती घेऊ शकतात.