मुंबई: कार कंपनी मारुती सुझुकी सध्या चांगलीच तेजीत आहे. कंपनीनं 2017-18 आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये 1.44 लाखाहून अधिक गाड्यांची विक्री केली आहे. एका महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्यांची विक्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
1.44 लाख गाड्यांची विक्री फक्त भारतातील आहे. मागील वर्षापेक्षा गाड्यांच्या विक्रीत यंदा 23 टक्के वाढ झाली आहे. पण निर्यातीत 30 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. पण तरीही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजार मिळून मारुती सुझुकीच्या विक्रीत जवळजवळ 20 टक्के वाढ झाली आहे.
जवळजवळ कंपनीच्या प्रत्येक मॉडलेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ऑल्टो आणि वॅगन आर या 39000 कारची विक्री झाली आहे. तर स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, डिझायर, बलेनो या कारच्या विक्रीमध्येही 39 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर सियाज सारख्या कारच्या विक्रीतही 23 टक्के वाढ झाली आहे.
कारच्या विक्रीत वाढ झाल्यानं उत्पादनाला आणखी चालना मिळणार आहे. त्यामुळे ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता आहे.