नवी दिल्ली : मारुती सुझुकीच्या इग्निस कारच्या लॉन्चिंगची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण येत्या दिवाळीत मारुती सुझुकीची इग्निस कार लॉन्च होणार आहे. ऑटो सेक्टरमध्ये या कारबाबत प्रचंड चर्चा सुरु होत्या. इग्निस कार पुढल्या वर्षी लॉन्च करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, या दिवाळीच्या आसपासच ही कार लॉन्च होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

फेब्रुवारी महिन्यात इंडियन ऑटो एक्स्पो-2016 मध्ये इग्निस कारचा पहिला लूक लॉन्च केला होता. या कारची स्पर्धा महिंद्राच्या केयूव्ही-100 या कारशी असणार आहे. या कारची विक्री मारुतीच्या प्रीमियम डिलरशिप नेक्साच्या माध्यमातून होणार आहे. नेक्सा आऊटलेटवर सध्या मारुतीची बलेनो हॅचबॅक आणि क्रॉसओव्हर एसयूव्ही एम-क्रॉसची विक्री होते आहे.

 

आकर्षक स्टाईल आणि विविध फीचर्समुळे कारप्रेमी इग्निस कारची वाट पाहत आहेत. या कारमध्ये ग्राऊंड क्लियरेन्स, मोठं रिअर विंडशील्ड, आकर्षक डिझाईन आणि प्रोजेक्टर हॅढलँप्ससारखे महत्त्वाचे आणि आधुनिक फीचर्स आहेत. या कारचं फ्रंट डिझाईन अत्यंत आकर्षक असं असून, डे टाईम रनिंग एलईडी लाईट्स, व्हील आर्च आणि बी-पिलरवर ब्लॅक फिनिशिंग आहे.

 

इग्निसच्या पॉवर स्पेसिफिकेशन्स अजून समजू शकले नाहीत. मात्र, यामध्ये 1.0 लीटर बूस्टरजेट पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. पेट्रोलवर चालणारी कार, काही दिवसांतच डिझेलचा पर्यायही देण्याची शक्यता आहे.