फेसबुकच्या ग्रुप चॅटमध्ये आता 250 जणांना अॅड करणं शक्य
एबीपी माझा वेब टीम | 15 Oct 2018 08:05 AM (IST)
फेसबुकच्या ग्रुप चॅटमध्ये आता एकाचवेळी 250 जणांना जोडून घेता येणार असून, या माध्यमातून आता मीटिंगपासून चर्चांपर्यंत, ते अगदी एकमेकांशी एखाद्या कॉमन विषयांवर गप्पा मारता येतील.
मुंबई : सध्याच्या घाईगर्दीच्या युगात एकमेकांशी संपर्क किंवा संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर सर्रास होताना दिसतो. कुणी व्हॉट्सअॅप वापरतो, कुणी फेसबुक, कुणी ट्विटर, तर कुणी आणखी काही. मात्र, या अनेकदा या प्लॅटफॉर्मवरुन एकाचवेळी काही मर्यादित संख्येतील मित्र-मैत्रिणींशी बोलता येतं. फेसबुकने हेच लक्षात घेऊन नवीन फीचर्स आणण्याचे ठरवले आहे. नव्या फीचरनुसार, फेसबुकवरुन एकाचवेळी 250 जण एकाच चॅटमध्ये जोडून घेऊ शकतात. याआधी फेसबुकच्या ग्रुपमध्ये केवळ 150 जणांचा समावेश करणं शक्य होतं. फेसबुकच्या ग्रुप चॅटमध्ये आता एकाचवेळी 250 जणांना जोडून घेता येणार असून, या माध्यमातून आता मीटिंगपासून चर्चांपर्यंत, ते अगदी एकमेकांशी एखाद्या कॉमन विषयांवर गप्पा मारता येतील. 'टेकक्रंच'च्या वृत्तानुसार, फेसबुकवर ग्रुप चॅट कुणी सुरु केल्यानंतर तुम्हाला त्याचं निमंत्रण देणारं नोटिफिकेशन येईल. तुमची परवानगी असेल आणि तुम्ही निमंत्रण स्वीकारलंत, तरच तुम्ही ग्रुप चॅटमध्ये सहभागी होऊ शकाल. विशेष म्हणजे, यामध्ये ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातूनही सहभागी होता येईल. मेसेज रिअॅक्शनचं नोटिफिकेशन, नोटिफिकेशन ऑन-ऑफ, चॅटदरम्यान मेन्शन करणं इत्यादी साऱ्या गोष्टीही या ग्रुप चॅटमध्ये असतील. किती जणांचा ग्रुप असावा, ग्रुप कधी बंद करावा, याचे अधिकार ग्रुप अॅडमिनकडे असतील.