मुंबई : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल निर्माता कंपनी मारुतीने 35 वर्ष जुन्या मारुती सुझुकी ओमनी (Omni) मॉडेलचं उत्पादन बंद केलं आहे. ओमनी भारतात अतिशय लोकप्रिय चारचाकी आहे. 35 वर्षांनंतरही विक्रीच्या बाबतीत ओमनीची कामगिरी चांगली होती. ओमनी आपल्या ग्राहकांना कस्टमायझेशनचा पर्यायही देत होती. म्हणजेच ग्राहक आपल्या सोयीनुसार, बॉडी टाईप्स निवडू शकत होते. पण कंपनीने आता याचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


35 वर्षांपासून बाजारात
मारुती सुझुकीची पहिली कार मारुती 800 लॉन्च झाल्यानंतर एक वर्षानंतर 1984 मध्ये ओमनी भारतात लॉन्च झाली होती. आता कंपनीने नव्या रस्ते सुरक्षा नियम आल्यानंतर याचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला.

म्हणून उत्पादन बंद
सेवेन्थ जनरेशन सुझुकी सुपर कॅरीवर आधारित ओमनीला नव्या नियमानुसार अपग्रेड केलेलं नाही, त्यामुळे कंपनीने त्याचं उत्पादन बंद केलं आहे. या मॉडेलला बाजारात अजूनही चांगली मागणी होती. ऑक्टोबर 2018 पर्यंत कंपनीने ओमनीचे 15.7 मिलियन मॉडेलची विक्री केली होती.

नवी इको मारुती सुझुकी इको लॉन्च
कंपनीने नुकतीच मारुती सुझुकी इको MPV भारतात लॉन्च केली आहे.  MPV मध्ये रिव्हर्स पार्किंग, को-ड्राइवर सीट बेल्ट रिमायंडरसारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. सरकार द्वारे ABS, एअरबॅग आणि BSVI नियम अनिवार्य केल्यानंतर अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या जुन्या कारचं प्रॉडक्शन बंद केलं आहे. नव्या सुरक्षा नियमानुसार मारुती सुझुकीने Eeco व्हॅनमध्ये आवश्यक सेफ्टी फीचर्स लावून बाजारात आणलं. अपडेटेड मारुती इकोच्या (Maruti Eeco) सुरुवातीच्या एक्स शोरुमची किंमत 3.55 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने Maruti Eeco ला आपल्या अधिकृत वेबसाईटवरही अपडेट केलं आहे. यासोबत नव्या इकोचा स्टेअरिंग व्हीलही बदललं आहे.