नवी दिल्ली : संपूर्ण देशात एकच कर असावा या दृष्टीनं लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळे गेल्या काही दिवसात मोदी सरकारवर बरीच टीका झाली. मात्र, जीएसटीमुळे कार विक्रीवर तरी काहीही परिणाम झाला नसल्याचं दिसून येत आहे. किमान मारुती सुझुकीनं जारी केलेल्या विक्रीच्या आकड्यांवरुन तरी ही गोष्ट समोर आली आहे.
कंपनीच्या मते, जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात म्हणजेच जुलै-सप्टेंबरच्या दरम्यान, 4.57 लाखांहून अधिक जास्त गाड्यांची विक्री केली आहे. मागील वर्षाच्या दुसऱ्या त्रैमासिकाच्या तुलनेनं तब्बल 19 टक्के अधिक विक्री यंदा करण्यात आली आहे. कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांच्या मते, संपूर्ण कार व्यवसायाचा विचार केल्यास विक्रीत 13 टक्के वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की, सध्या बाजारात कारसाठी बरीच मागणी आहे. तसेच अर्थव्यवस्थेत मंदी असल्याचंही त्यांनी नाकारलं.
वाहनांच्या विक्रीत वाढ होत असल्याचं वक्तव्य मोदींनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. त्यानंतर आता हे आकडे समोर आले आहेत.
दरम्यान, या संपूर्ण वर्षभरात मारुती सुझुकीच्या विक्रीत नक्कीच वाढ दिसून येईल असा अंदाज भार्गव यांनी केलं आहे. तसेच बाजारातही तेजी दिसून येईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. याचवेळी भार्गव यांनी स्पष्ट केलं की, कंपनी इलेक्ट्रिक कार देखील तयार करणार आहे.
मारुतीला सुझुकीला 2017-18 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या त्रैमासिकात तब्बल 2484 कोटींचा नफा झाला आहे. मागील वर्षी दुसऱ्या त्रैमासिकात कंपनीला 2402 कोटींचा नफा झाला होता. म्हणजेच यंदा 3.41 टक्के अधिक नफा झाला आहे.
जीएसटीनंतर मारुती सुझुकी कारच्या विक्रीत 19 टक्क्यांनी वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2017 10:27 PM (IST)
जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात म्हणजेच जुलै-सप्टेंबरच्या दरम्यान, 4.57 लाखांहून अधिक जास्त गाड्यांची विक्री केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -