मुंबई : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आणि फेसबुकविरोधात जगभरात संताप वाढत आहे. याचं कारण म्हणजे व्हॉट्सअॅप आणि फेसबुकने आपली प्रायव्हसी पॉलिसी बदलण्याचा घेतलेला निर्णय. या पॉलिसीमुळे युझर्सची वैयक्तिक माहिती लीक होण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचं टेंशन वाढवलं आहे. मस्क यांनी लोकांना मेसेजिंग अॅप 'सिग्नल' (Signal) वापरण्याचं आवाहन केलं आहे. व्हॉट्सअॅपचे मालकी हक्क मार्क झुकरबर्गकडे आहेत.


टेस्ला आणि स्पेस एक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी युझर्सना व्हॉट्सअॅप तसंच फेसबुकऐवजी जास्त एनक्रिप्टेड सुविधा असलेलं अॅप वापरण्याचं आवाहन केलं आहे. जेव्हा त्यांच्या फॉलोअर्सनी त्यांना सुरक्षिक पर्यायांबाबत विचारलं तेव्हा त्यांनी विशेषत: 'सिग्नल'चा उल्लेख केला.


नव्या अटींमुळे व्हॉट्सअॅपवर सोशल मीडियावर टीका होत आहे. यामुळे सिग्नल आणि टेलिग्राम यांसारख्या मेसेजिंग अॅपची मागणी अचानक वाढली आहे. यानंतर इलॉन मस्क यांनी दोन शब्दाचं ट्वीट केलं. त्यात लिहिलं होतं की, 'युज सिग्नल अर्थात सिग्नल वापरा.'





सिग्नलची लोकप्रियता वाढली
व्हॉट्सअॅप एंड टू एंड एनक्रिप्शन टेक्नोलॉजीचा वापर करतं. परंतु व्हॉट्सअॅपने बुधवारी (6 जानेवारी) युजर्ससाठी नव्या अटी लागू केल्या. यानुसार युजर्सना व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुक इंक आणि दुसऱ्या सहयोगी कंपन्यांना त्यांची माहिती जमा करण्याची परवानगी दिली जाईल. यामध्ये फोन नंबर आणि लोकेशनचा समावेश आहे.


काही जणांनी व्हॉट्सअॅपच्या या पॉलिसीवर प्रश्न उपस्थित केले आहे आणि युजर्सना सिग्नल तसंच टेलिग्राम यांसारख्या अॅपकडे वळण्याचं आवाहन केलं आहे. मस्क यांची साथ मिळाल्याने 'सिग्नल'ची लोकप्रियता आणखी वाढली आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांमध्ये इलॉन मस्क यांचाही समावेश आहे. इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या मस्क यांची कंपनी टेस्ला ही फेसबुकला मागे टाकून वॉल स्ट्रीटची पाचवी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. या कंपनीचा मार्केट कॅप 800 अब्ज डॉलरच्या पार पोहोचला आहे.


सिग्नल अॅप काय आहे?
फेसबुकनला विकल्यानंतर व्हॉट्सअॅपचे सह-संस्थापक ब्रायन अ‍ॅक्टनने सिग्नल फाऊंडेशनची स्थापना केली होती. फेसबुक मेसेंजर प्रमाणेच हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप देखील जगातील सर्वात सुरक्षित मानले जाते. सिग्नल एक प्रसिद्ध प्रायव्हसी-फोकस्ड मेसेजिंग अॅप आहे, ज्याचा वापर जगभरातील सिक्युरिटी एक्स्पर्ट्स, प्रायव्हसी रिसर्च, अकॅडमिक्स आणि पत्रकार करतात. सिग्नल प्रोटोकॉल व्हॉट्सअॅपच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनही ठरवलं. मात्र यामधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे सिग्नल ओपन सोर्स आहे, व्हॉट्सअॅप नाही.


...तर व्हॉट्सअॅप डिलीट होणार
काही दिवसांपासून व्हॉट्सॅप नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे चर्चेत आहे. 8 फेब्रुवारी 2021 पासून, व्हॉट्सअॅप आपली प्रायव्हसी धोरण बदलणार आहे. या पॉलिसीमध्ये युजर्ससमोर अट ठेवली आहे की, जर त्यांनी नवी पॉलिसी स्वीकारली नाही तर त्यांना अॅपचा वापर करता येणार नाही आणि ते अॅप फोनमधून डिलीट होईल.


Signal App आणि WhatsApp काय फरक आहे?


- सिग्नल अॅप कोणत्याही प्रकारे युजरची माहिती संकलित करत नाही तर व्हॉट्सअॅपने आता युजरची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.


- सिग्नल अ‍ॅप केवळ युजरचा मोबाईल नंबर घेते तर व्हॉट्सअॅप सर्व डेटा, फोन नंबर, संपर्क यादी, स्थान, संदेश गोळा करतं.


- सिग्नल अ‍ॅप आपल्या मोबाईल क्रमांकास ओळख देत नाही, तर व्हॉट्सअ‍ॅप गोळा करत असलेला डेटाद्वारे युजरचे प्रोफाईल तयार होते.


- सिग्नल अ‍ॅपमध्ये व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे आपण एकमेकांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही.


Whatsapp Privacy Policy | बदल फक्त व्यावसायिक खाते धारकांसाठी; व्हॉट्सअ‍ॅपचं स्पष्टीकरण