मुंबई : सोशल मीडियातील जायंट मानल्या जाणाऱ्या फेसबुकला अब्जावधींचा तोटा सहन करावा लागला आहे. यूजर्सचा डेटा लीक प्रकरणात फेसबुकला मोठा दणका बसला आहे.


शेअर बाजारात फेसबुकचे शेअर्स सोमवारी सात टक्क्यांनी घसरले आणि याचा नुकसान फेसबुकला सोसावा लागला. शेअर घसरल्याने 6.06 अब्ज डॉलरचं (395 अब्ज रुपये) नुकसान झालं.

काय आहे प्रकरण?

2017 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या 'कॅम्ब्रिज अॅनालिटिका' या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला गेला, असाही आरोप आहे.

ब्रिटनस्थित कॅम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कशाप्रकारे मदत केली, यासंदर्भात अमेरिकन आणि युरोपियन खासदारांनी 'फेसबुक इंक'कडे उत्तर मागितले आहे.

एकंदरीत फेसबुकवरील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.

सोमवारी अमेरिकन शेअर बाजार उघडल्यानंतर फेसबुकच्या शेअर्सची जवळपास 5.2 टक्क्यांनी घसरण होत 175 डॉलरवर आले. ही घसरण आणखी वाढत पुढे 7 टक्क्यांवर पोहोचली. नव्या वर्षात 12 जानेवारीनंतर ही पहिलीच मोठी घसरण असल्याची माहिती मिळते आहे. यामुळे फेसबुकच्या मार्केट कॅपिटलमध्ये जवळपास 32 अब्ज डॉलरची घसरण होत, 500 अब्ज डॉलरवर स्थिरावला.