मुंबई : गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवरुन विविध कंपन्यांकडून आपल्या जाहिराती काढून घेण्याचे प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. यासाठी जाहिरात देणाऱ्या कंपन्यांसोबत इतर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित होण्यावर गूगलचं नियंत्रण कमी होत असल्याचं बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वी एटीएंडटी, वेरिजॉन, जॉनसन अॅन्ड जॉनसन,फोक्सवॅगन सारख्या नामांकित कंपन्यांनी आपल्या जाहिराती यूट्यूबवरुन मागे घेतल्यानंतर, आता पेप्सिको, वॉलमार्ट स्टोअर्स आणि स्टारबक्ससारख्या कंपन्यांनीही आपल्या जाहिराती मागे घेतल्या आहेत.
या तिन्ही कंपन्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमधील गूगलच्या ऑटोमेटेड प्रोग्राममुळे त्यांच्या ब्रॅण्डच्या जाहिरातीसोबत वर्णभेदाच्या साहित्याचे पाच व्हिडिओ प्रसारित केल्यानं कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतं आहे.
यूट्यूबवरुन एटीएंडटी, वेरिजॉन, जॉनसन अॅन्ड जॉनसन,फॉक्सवॅगन आणि इतर काही नामांकित कंपन्यांनीही आपल्या जाहिराती यूट्यूबवरुन काढून घेतल्यानंतर गूगलनं त्यांची जाहीर माफी मागितली. तसेच त्यांच्या जाहिरातींसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित न करण्यासंबंधी पावले उचलण्यात येतील, असं आश्वासनंही दिलं होतं. मात्र, तरीही यामध्ये कोणताच बदल दिसून येत नाही आहे.
सध्या यूट्यूब व्हिडिओमध्ये जाहिरात प्रसारित करण्यासाठी गूगलला ऑटोमेटेड प्रोग्रामचाच आधार घ्यावा लागतो. या माध्यामातून यूट्यूबवर एका मिनिटाला तब्बल 400 व्हिडिओ पोस्ट केले जातात. त्यामुळे या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आपलं मनुष्यबळ वाढवणे, चांगल्या दर्जाचे व्हिडिओ पोस्ट करणे आदीसाठी गूगल प्रभावी प्रोग्राम विकसित करेल, असं स्पष्ट केलं होतं.
पण आपल्याला जोपर्यंत विश्वास बसत नाही, तोपर्यंत ते यूट्यूबवर जाहिराती प्रसिद्धीसाठी देणार नसल्याची भूमिका कंपन्यांनी घेतली आहे. त्यामुळे गूगलला अब्जावधी डॉलरचा फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गूगलकडूनही जाहिरातदार कंपन्यांची मोठी मनधरणीचं काम सुरु आहे.