नवी दिल्ली : बीएसएनएल या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीने आपल्या यूझर्सना तातडीने पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे. याच आठवड्यात बीएसएनएलच्या एका सेक्शनवर मालवेअरचा हल्ला झाला आणि याचा 2 हजार ब्रॉडबँड मॉडेमवर परिणाम झाला. डिफॉल्ट पासवर्ड न बदलल्याने या मॉडेमवर मालवेअरचा हल्ला झाल्याचे निदर्शनास आले आहे.

बीएसएनलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांच्या माहितीनुसार, “मालवेअर हल्ल्याविरोधात बऱ्यापैकी सामना केला आहे. मात्र तरीही ग्राहकांना आम्ही सल्ला देतो की, आपापले पासवर्ड तातडीने बदला. एकदा पासवर्ड बदलल्यानंतर यूझर्सने कसलीही काळजी करु नये.”

“बीएसएनलच्या कोअर नेटवर्क, बिलिंग किंवा अन्य प्रणालीवर मालवेअरचा हल्ला झालेला नाही. मालवेअर हल्ला झालेल्या मॉडेममध्ये लॉग-इन होत नव्हतं. याच आठवड्याच्या सुरुवातीला ही घटना समोर आली. बीएसएनएलच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून यूझर्सना सतर्क केले जात असून, आवश्यक ते सल्लेही दिले जात आहेत.”, अशी माहितीही अनुपम श्रीवास्तव यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून जगभरात सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच रॅन्समवेअर हल्ल्याचा युरोप, चीन आणि भारतीय नेटवर्कवर मोठा परिणाम झाला होता. ब्रिटिश मेडिकल नेटवर्कलाही रॅन्समवेअरने नुकसान पोहोचवलं होतं.