मुंबई : सोशल साईट्सच्या माध्यमातून एकाच वेळी अनेकांशी संपर्कात राहता येतं, मात्र या फायद्यांसोबतच अनेक धोकेही वारंवार समोर येत असतात. फेसबुकवरचे मित्र अनेक वेळा तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता असते. असाच एक प्रकार म्हणजे मधू शाह या नावाने एका महिलेच्या फेसबुक प्रोफाईलने घातलेला धुमाकूळ.
मधू शाह या नावाने एका महिलेची एक-दोन नव्हे तर तब्बल 27 हून अधिक फेसबुक अकाऊण्ट्स तयार करण्यात आली आहेत. धक्कादायक म्हणजे ज्या मधू शहाच्या नावाने ही अकाऊंट आहेत आणि रिक्वेस्ट्स पाठवल्या जात आहेत, ती मुळात अस्तित्वातच नाही. काही जणांनी फेक अकाऊंट्स सुरु करुन लोकांशी मैत्री करत त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे.
काही दिवसांपूर्वीच हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ही फेक अकाऊंट्स बंद करण्यासाठी सोशल मीडियावर मोहिम सुरु झाली. हजारो यूझर्सनी या महिलेच्या नावे सुरु झालेल्या अकाऊंटविरोधात आवाज उठवला आहे. स्टेटस लिहून अनेक जण आपल्या मित्रांना सावध राहण्याचा इशाराही देत आहेत.