मुंबई : आपल्याला खोटं पाडणाऱ्या मित्रांसमोर खरेपणाचे पुरावे देण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट काढायचात का? किंवा क्रशने आपल्याला कसे प्रेमाचे मेसेज पाठवले, याची मित्रांसमोर फुशारकी मारण्यासाठी तुम्ही तिच्या चॅटचे स्क्रीनशॉट पाठवायचात का? मग तुम्हाला यापुढे असं करता येणार नाही. कारण व्हॉट्सअॅप लवकरच स्क्रीनशॉट काढण्यास बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

गूगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅप बीटा अपडेटमध्ये हे अपडेट पाहायला मिळत आहे. स्क्रीनशॉटबंदीसोबतच व्हॉट्सअॅप अँड्रॉईड फोनसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन लागू करण्याचीही तयारी करत आहे. 'फिंगरप्रिंट सिक्युरिटी' असं या फीचरचं नाव आहे. गोपनीयता वाढवण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून ही पावलं उचलण्यात येत आहेत.

सध्या आयफोनधारकांना फेस आयडी/टच आयडी रेकग्निशननेच व्हॉट्सअॅप वापरावं लागतं. मात्र तूर्तास आयफोनमध्ये स्क्रीनशॉटबंदी घालण्यात आलेली नाही. अँड्रॉईडधारकांना हे फीचर अपडेट झाल्यानंतर याविषयी सुस्पष्टता येईल.

बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा ऑप्शन पाहण्यासाठी तुम्हाला सेटिंग्ज > अकाऊण्ट > प्रायव्हसी चेक करावं लागेल. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅप ऑटोमॅटिकली लॉक करण्यासाठी एक मिनिट, दहा मिनिटं, तीस मिनिटं किंवा लगेच असे पर्याय असतील. फिंगरप्रिंट चुकीचे असले, किंवा अनेक वेळा चुकीचे प्रयत्न झाले, तर व्हॉट्सअॅप काही मिनिटांसाठी लॉक होईल.