मुंबई : रिलायन्सच्या जिओ फोनची शिपिंग रविवारपासून सुरु झाली आहे. हा फोन ग्राहकांना केवळ 1500 रुपये अनामत रक्कम ठेवून खरेदी करता येणार आहे. मात्र या फोनवर जवळपास 40 टक्के सबसिडी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे 2500 रुपयांचा हा फोन ग्राहकांना 1500 रुपयांत मिळत आहे.
'रॉयटर'च्या वृत्तानुसार एक जिओ फोन तयार करण्यासाठी 2500 रुपये खर्च आहे. मात्र ग्राहकांना 1500 रुपयांमध्ये हा फोन देण्यात आला. ही रक्कमही तीन वर्षांमध्ये परत मिळणार आहे. म्हणजे जिओ फोन ग्राहकांना मोफत मिळेल.
दरम्यान जिओने रिटर्न-रिफंड पॉलिसीमध्ये बदल केल्याचीही माहिती आहे. 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार, निश्चित केलेल्या तीन वर्षांच्या आतही ग्राहक हा फोन परत करु शकतात. मात्र त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. एका वर्षातच हा फोन परत केल्यास ग्राहकांना पैसे परत मिळणार नाहीत. याउलट 1500 रुपये आणि जीएसटी भरावा लागेल.
ग्राहकांनी 12-14 महिने म्हणजे एका वर्षानंतर फोन परत केला तर त्यांना जिओकडून 500 रुपये परत मिळतील. 24-36 महिन्यांमध्ये हा फोन परत केल्यास 1000 रुपये मिळतील. तर 36 महिन्यांनंतर म्हणजे तीन वर्षांनंतर फोन परत केला तर 1500 रुपये परत मिळतील.
जिओ फोन हा शून्य रुपयांमध्ये ग्राहकांना दिला जाईल. फक्त अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागतील, जे परत मिळतील, असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी फोन लाँच करताना 21 जुलै रोजी म्हटलं होतं. फोन खरेदी करताना 1500 रुपये द्यावे लागतील आणि तीन वर्षांनी हे पैसे परत मिळतील.