नवी दिल्ली : भारत मोबाईल ब्रॉडबँडच्या वापरात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि चीनपेक्षाही भारतात मोबाईल ब्रॉडबँडचा जास्त प्रमाणात वापर केला जातो, असा दावा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केला.


एक वर्षापूर्वी मोबाईल ब्रॉडबँडच्या वापरात भारत 150 व्या क्रमांकावर होता. मात्र जिओच्या लाँचिंगनंतर भारत एका वर्षात पहिल्या स्थानावर आला, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. एचटी लीडरशिप समिटमध्ये ते बोलत होते.

भारतीय अर्थव्यवस्थेवरही मुकेश अंबानींनी भाष्य केलं. ''पुढच्या दहा वर्षांमध्ये भारत जीडीपीमध्ये 2.5 ट्रिलीयन अमेरिकन डॉलरहून 7 ट्रिलीयन डॉलरवर येऊ शकतो, शिवाय सर्वात जास्त जीडीपी असणाऱ्या देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानाहून तिसऱ्या स्थानावर येईल'', असंही मुकेश अंबानी म्हणाले.

''आपण पुढच्या दहा वर्षात जीडीपी तीन टक्क्यांनी वाढवून सात ट्रिलीयन डॉलर करु शकतो का आणि जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनू शकतो का? तर आपण बनू शकतो'', असं अंबानी म्हणाले.

''तेरा वर्षांपूर्वी मी म्हणालो होतो, की भारताची अर्थव्यवस्था आज 500 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आहे आणि येत्या 20 वर्षात ही पाच ट्रिलीयन अमेरिकन डॉलर्सची होईल. आज ही भविष्यवाणी खरी होताना दिसत आहे. हे लक्ष्य आपण 2024 पर्यंत पूर्ण करु शकतो'', असं अंबानी म्हणाले.

''माहिती आणि तंत्रज्ञान विकासासाठी आवश्यक आहे आणि आपण हे तंत्र अवलंबलं आहे. अनेक देशांनी नवं तंत्रज्ञान न स्वीकारल्याने ते जागतिक शक्ती होऊ शकलेले नाहीत'', असंही अंबानींनी सांगितलं.