गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिओ गिगा फायबर ब्रॉडबँड सेवेची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. जिओच्या या ब्रॉडबँड सेवेबाबत कित्येक दिवसांपासून अनेक अंदाज बांधले जात आहेत. गेल्या वर्षभरापासून देशात अनेक ठिकाणी जिओ गिगाफायबर सेवेची चाचणी सुरु आहे.  मात्र उद्या होणाऱ्या रिलायन्स कंपनीच्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जिओ गिगाफायबर सेवेची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे.

जिओ गिगा फायबर सेवेच्या अधिकृत घोषणेबाबत बरीच उत्सुकता आहे. जिओच्या मोबाईल इंटरनेट सेवेप्रमाणेच ब्रॉडबँड सेवादेखील मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होईल अशी शक्यता आहे.  उद्या होणाऱ्या रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत जिओ गिगा फायबरसह इतरही अनेक घोषणा होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. यावेळी जिओकडून जिओफोन 3 ची घोषणा केली जाऊ शकते, असाही अंदाज आहे. जिओफोन 2 नंतर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात अँड्रॉइड स्मार्टफोन देण्याचा जिओकडून प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

जिओ गिगा फायबर सेवेची भारतातील काही महत्त्वाच्या शहरात गेल्या वर्षभरापासून चाचणी सुरु आहे. काही मोजक्या ग्राहकांना या सेवेची जोडणी देण्यात आलेली आहे. मात्र लवकरच या सेवेची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. या सेवेसाठीचे प्रतिमाह दर 600 रुपयांपासून सुरु होणारे असतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. यामध्ये ग्राहकांना 100 जीबीपर्यंत डाऊनलोड मर्यादा आणि 50 एमबीपीएस पर्यंत इंटरनेट स्पीड मिळू शकेल असा अंदाज आहे. यासोबतच इतरही वेगवेगळे ब्रॉडबँड प्लान असणार आहेत. ब्रॉडबँड इंटरनेटसेवच्या जोडणीसोबतच मोफत लँडलाईन सेवाही देण्यात येईल, असंही बोललं जात आहे.

जिओ गिगा टीव्हीची सुद्धा घोषणा होणार?
जिओ गिगा फायबर सेवेच्या घोषणेसोबतच जिओच्या टिव्हीसेवेची देखील उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये जिओकडून पारंपारिक डीटीएच पद्धतीऐवजी आयपीटीव्ही तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असा अंदाज आहे. म्हणजेच गिगा फायबर सेवेद्वारेच टीव्ही चॅनलची सेवा पुरवली जाणार आहे.