मुंबई : 31 मार्च 2017 पर्यंत नव्या आणि जुन्या ग्राहकांना जिओची 4G इंटरनेट सेवा मोफत देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत मुकेश अंबानी बोलत होते.
तसंच जिओचं कार्ड आता घरपोच मिळणार असून पाच मिनिटांत सिम कार्ड अॅक्टिव्हेट होईल. शिवाय इतर मोबाईल नंबरही जिओ 4Gमध्ये पोर्ट करण्याची सोय असल्याचंही अंबानी यांनी सांगितलं.
मुकेश अंबानी यांनी या कार्यक्रमात ग्राहक, सरकार आणि ट्रायचे आभार मानले. तसंच इतर कंपन्यांनी सहकार्य न केल्याने कॉल ड्रॉप झाल्याची नाराजीही त्यांनी बोलून दाखवली.
1 सप्टेंबर 2016 रोजी जिओची 4G सेवा लॉन्च झाली. लॉन्च झाल्यापासून अवघ्या 3 महिन्यातच जिओचे 5 कोटींपेक्षा जास्त ग्राहक झाले आहेत. तसंच दिवसाला 6 लाख ग्राहक जिओ 4Gची सेवा घेत असल्याचं मुकेश अंबानी यांनी नमूद केलं.
मुकेश अंबानी म्हणाले की, फेसबुक, व्हॉट्सअॅपपेक्षाही जिओची सेवा झपाट्याने वाढत आहे. आणखी चांगली सेवा देण्याचे जिओचे प्रयत्न आहेत. तसंच इंटरनेटचा स्पीड वाढवण्यावर जोर देणार आहे.