मुंबई: स्मार्टफोन यूजर्ससाठी आजकाल इंटरनेट स्पीड हे फार गरजेचं झालं आहे. दूरसंचार नियामक म्हणजेच ट्रायच्या डेटानुसार इंटरनेट स्पीडच्याबाबतीत रिलायन्स जिओ पहिल्या क्रमांकावर आहे. ट्रायकडून फेब्रुवारी महिन्याचं एव्हरेज डाऊनलोड मोबाइल ब्रॉडबॅँड स्पीड डेटा जारी करण्यात आला.


ट्रायच्या मते, रिलायन्स जिओचा डेटा डाऊनलोड स्पीड इतर कंपन्यांच्या तुलनेनं जवळजवळ दुप्पट आहे.

या महिन्यात जिओ नेटवर्क सर्वात वेगवान ठरलं आहे. जिओ नेटवर्कचा या महिन्यातील इंटरनेट स्पीड 16.48 एमबीपीएस होता.  जर या स्पीडनं डाऊनलोडचा विचार केल्यास एक सिनेमा पाच मिनिटात डाऊनलोड होऊ शकतो.

जिओचे प्रतिस्पर्धी आयडिया सेल्युलर 8.33 एमबीपीएस दुसऱ्या स्थानावर आणि एअरटेल 7.66 एमबीपीएस तिसऱ्या स्थानावर आहे. तर वोडाफोनचा स्पीड 5.66 एमबीपीएस आहे. तर बीएसएनएलचा 2.89 एमबीपीएस आहे.

ट्रायच्या डेटानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सरासरी डाऊनलोड स्पीड रिलायन्स कम्युनिकेशन्ससाठी 2.67 एमबीपीएस तर टाटा डोकोमोसाठी 2.67 एमबीपीएस तर एअरसेलसाठी 2.01 एमबीपीएस आहे. इतर नेटवर्कसाठी सरासरी डाऊनलोड स्पीड उपलब्ध नाही. दरम्यान, देशात सर्वात वेगवान नेटवर्क आपलंच आहे असा दावा जिओ आणि एअरटेलकडून करण्यात येत आहे.