बीएसएनलची जबरदस्त ऑफर, 249 रुपयांत दररोज 10 जीबी डेटा
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2017 06:40 PM (IST)
नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या ऑफरनंतर सर्वच टेलिकॉम कंपन्या आपापल्या ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी धडपड करत आहेत. त्यातच आता बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी अत्यंत स्वस्त ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरनुसार कंपनी आता आपल्या ग्राहकांना दररोज 10 जीबी इंटरनेट डेटा देणार आहे. इतर कंपन्यांना धडकी भरवणाऱ्या बीएसएनएनलच्या नव्या ऑफरची किंमत 249 रुपये आहे. यामध्ये दररोज 10 जीबी इंटरनेट डेटा आणि त्याचसोबत रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळेल. याचाच अर्थ बीएसएनएलने व्हॉईस कॉलिंगबाबत हात आखडता घेतला आहे. मात्र, इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलच्या ऑफरमध्ये सर्वाधिक डेटा दिला जात आहे. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, बीएसएनएलच्या प्लॅननुसार डेटा स्पीड 2Mbps मिळणार आहे. म्हणजे डेटा स्पीडमध्येही बीएसएनएलने हात आखडता घेतला आहे. कारण इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत हा स्पीड खूपच कमी आहे. मात्र, हा प्लॅन आतापर्यंतचा सर्वात स्वस्त मानला जातो आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्सने जिओच्या प्राईम मेंबरशीपची मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्याचसोबत जिओ समर सरप्राईजचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहे आणि यातून सर्वच कंपन्या आपापल्या ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी नव-नव्या स्कीम लॉन्च करत आहेत.