लखनऊ : व्हॉट्सअॅपवर कधी कोण काय पाठवेल याचा नेम नाही. असंख्य ग्रुपवरुन येणारे मेसेज कधी विनोदी, कधी सिरियस, कधी उपदेश देणारे, कधी प्रेरणा देणारे तर कधी नॉटी असतात.

व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज करताना भान राखायला हवं. कारण धनुष्यातून सुटलेला बाण आणि व्हॉट्सअॅपवरुन पोस्ट झालेला मेसेज मागे घेता येत नाही. एखादा मेसेज ठरवलेल्या ग्रुपवर न पोस्ट करता, चुकून दुसऱ्याच ग्रुपवर पोस्ट झाला, आणि तो मेसेज जर नॉटी असेल, तर काय पंचाईत होते, हे ज्याचं त्यालाच माहित.

असाच काहीसा प्रकार पोलीसांच्या ग्रुपवर, त्यातही आयपीएस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर घडला आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशात आयपीएस अधिकाऱ्यांच्या एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये सर्व जिल्हा पोलीसप्रमुख, पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक असे सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत.

या ग्रुपवर पोलिसांच्या समस्या, सुरक्षा, बदल्या, पोलीस निर्णय वगैरे सर्व मेसेज पोस्ट होतात. मात्र एका आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याने एक इमेज पोस्ट केली आणि सगळा घोळ झाला. ती इमेज होती एका न्यूड मुलीची. आयजी साहेबांनी फोटो पोस्ट केला ती वेळही रात्रीची होती.

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये गोंधळ

आयजी साहेबांनी असा फोटो शेअर केल्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर एकच गदारोळ सुरु झाला. कोणी टिंगल करु लागला, तर कोणी प्रश्न विचारु लागला. मात्र आयजी साहेबांनी सॉरी म्हणत, चुकून फोटो पोस्ट झाल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर हा फोटो मी दुसऱ्या ग्रुपवर पोस्ट करत होतो, चुकून इथे झाला, अशी सारवासारवही केली. तसंच फोटो तातडीने डिलीटही केला.

'तो' फोटो आयपीएसच्या ग्रुपवरुन आयएएसच्या ग्रुपवर

दरम्यानच्या काळात तोच फोटो आयपीएसच्या ग्रुपवरुन आयएएसच्या ग्रुपवर फॉरवर्ड झाला. फोटो फॉरवर्ड होत असल्याचं पाहून आयजी साहेबांनी पुन्हा माफी मागितली. मात्र फोटो फॉरवर्ड होणं काही थांबलं नाही. हा फोटो एका एसपीने दुसऱ्या एका ग्रुपवर फॉरवर्ड केला. मग तोच फोटो फॉरवर्ड होत मुख्यमंत्र्यांच्या सचिवापर्यंत पोहोचला. मग हा सर्व गोंधळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही समजला.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले. पोलीस महासंचालक जावीद अहमद यांना फोन करुन या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.