मुंबई: मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कम्प्युटरवर इंटरनेट वापरणाऱ्यांपेक्षा जास्त झाली आहे. एका नुकत्याच केलेल्या संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे.


काही रिपोर्टनुसार, स्टेट काउंटर नावाच्या एका इंटरनेट मॉनिटरिंग साइटनं आपल्या संशोधनात म्हटलं आहे की, जवळजवळ 51.2 टक्के लोकं मोबाइल इंटरनेटचा वापर करतात. तर कम्प्युटरवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 48.7 टक्के आहे. स्टेट काउंटरच्या मते, असा निकाल आजवर त्यांना पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे.

असं म्हटलं जात आहे की, इंटरनेटच्या क्षेत्रातील ही फारच सकारात्मक गोष्ट आहे. भारतात मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

या संशोधनातून एक गोष्ट समोर आली आहे की, अमेरिका, यूके आणि इस्त्रायल या देशांमध्ये आजही लोका सर्वात जास्त इंटरनेटचा वापर कम्प्युटरवर करतात. दरम्यान, मे महिन्यात देखील गुगलने खुलासा केला होता की, कम्प्युटरपेक्षा मोबाइलवरुन सर्वाधिक सर्च केलं जातं.