नवी दिल्ली : डुकाटीने मागील वर्षी ईआयसीएमएमध्ये आपली जबरदस्त 'पॅनिगल व्ही4 स्पेशल' सादर केली होती. सोबतच या बाईकचे केवळ 1500 युनिट्सच बनवण्यात येतील, अशी घोषणाही कंपनीने केली होती. डुकाटीने एप्रिल 2018 मध्ये या बाईकची बुकिंग सुरु केली होती आणि आता भारतात पहिली डुकाटी पॅनिगल व्ही4 स्पेशल बाईक दाखल झाली आहे.

डुकाटीची ही बाईक मोटरसायकल्सचा शौकिन कार्तिकेय उनियालने 55 लाख रुपयांमध्ये खरेदी केली आहे. भारतात या बाईकची शोरुम किंमत 51 लाख रुपये आहे, तर ऑनरोड त्याची किंमत 55 लाख रुपयांवर पोहोचली आहे. लिमिटेड प्रॉडक्शनमुळे भारतीय बाजारात आलेली पॅनिगल व्ही4 स्पेशल ही एकमेव एडिशन बाईक असू शकते.

या बाईकमध्ये 1,103cc एल-ट्विन इंजिन आहे. हे इंजिन 13,750 rpm वर 226 Bhp ची पॉवर आणि 11,000 rpm वर 133.6 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनने परिपूर्ण आहे. यामध्ये कॉर्नरिंग एबीएस, डुकाटी ट्रॅक्शन कंट्रोल, डुकाटी स्लाईड कंट्रोल, डुकाटी वीली कंट्रोल, इंजिन ब्रेक कंट्रोल आणि ऑटो टायर कॅलिबरेशन फीचर्स देण्यात आले आहेत.

इंधनाशिवाय या बाईकचं वजन 174 किलो आहे. या बाईकमध्ये कमी वजनाची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. यामधील ओहलिन्स सस्पेंशन फ्रंट आणि रिअर, दोन्ही दिशने पूर्णत: अॅजस्टेबल आहे. ही बाईक आपल्या रेंजमध्ये युनिक आहे. तरीही कावासाकी निन्जा एच2 आणि एप्रिलिया आरएसव्ही4 कडून तिला टक्कर मिळू शकते.