मुंबई : जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत भारतात 4 लाख 36 हजारांहून अधिक सायबर हल्ले झाले आहेत. एफ-सेक्युअर या सायबर सुरक्षेसंबंधी काम आणि संशोधन करणाऱ्या संस्थेने जगभरातल्या सायबर गुन्ह्यांचे तसेच सायबर हल्ल्यांचे सर्वेक्षण केले. संस्थेच्या अहवालामध्ये भारतात झालेल्या सायबर हल्ल्यांची माहिती समोर आली आहे. देशातले सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढल्याची बाब त्यामुळे समोर आली आहे.
भारतावर अमेरिका, रशिया, चीन आणि नेदरलँड या देशांमधून सर्वाधिक सायबर हल्ले झाले आहेत. जगभरातल्या सायबर हल्ल्यांची माहिती जमा करण्यासाठी तसेच सायबर गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी एफ-सेक्युअरने जगभरात 41 ठिकाणी हनीपॉट्स (सायबर घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेले केंद्र) तयार केले आहेत.
रशियातून भारतात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 2,55,589 सायबर हल्ले झाले आहेत. त्यानंतर अमेरिकेतून 1,03,458, चीनमधून 42,544, नेदरलँडमधून 19,169 आणि जर्मनीतून 15,330 सायबर हल्ले भारतावर झाले आहेत.
जसे भारतावर इतर देशांमधून सायबर हल्ले करण्यात आले आहेत. अगदी त्याचप्रमाणे भारतातूनही इतर देशांमध्ये सायबर हल्ले झाले आहेत. भारतातून इतर देशांत 35,563 सायबर हल्ले करण्यात आले आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रिया (12,540), नेदरलँड (9,267), ब्रिटन (6347), जपान (4,701) आणि युक्रेन (3,708) या देशांचा समावेश आहे.