बंगळुरु:  अमेरिकेची गोपनिय माहिती लीक करणारा अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेनने ‘आधार’बाबत मोठा धोका व्यक्त केला आहे. UIDAI ने आधारच्या माध्यमातून सार्वत्रिक दक्षता प्रणाली तयार केली आहे. मात्र भारतीयांनी आधारशी सर्व काही जोडल्याने, भारताला ‘सिव्हील डेथ’ अर्थात व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या समाप्तीचा धोका आहे, असं स्नोडेनने म्हटलं आहे.

आधार नंबरशी फोन नंबर लिंक केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्या वादाबाबत बोलताना स्नोडेनने हा धोका व्यक्त केला. स्नोडेनने त्यासाठी नुकतंच मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह झालेल्या आणि नंतर गुगलने स्पष्टीकरण दिलेल्या आधारच्या कस्टमर केअर नंबरचा दाखला दिला.

स्नोडेन म्हणाला, “यूआयडीएआयने हॅकिंगप्रकरणात ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यामध्ये फायदे कमी आणि दक्षता घेण्याच्या सूचनाच जास्त दिल्या आहेत”.

पत्रकारांनी जयपूरमध्ये आयोजिक केलेल्या एका कार्यक्रमात स्नोडेनने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला. त्यामध्ये त्याने ‘आधार’बाबत आपली मतं व्यक्त केली.

“भारतातील आधारसक्ती धडकी भरवणारी आहे. कारण भारतात प्रत्येकाला आधार सक्ती इतक्या मोठ्या प्रमाणात केली आहे की, तुम्ही तिथे बाळाला जन्म देण्यापूर्वी असो किंवा बाळाचा जन्म दाखला असो, सगळीकडे आधारसक्ती आहे”, असं स्नोडेनने नमूद केलं.

ज्या एजन्सी, संस्था आधार माहितीचा गैरवापर करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असा सल्ला यावेळी स्नोडेनने दिला. शिवाय स्नोडेनने UIDAI करत असलेल्या युक्तीवादावरही टीका केली.

आधार हा एक मोठा घोटाळा आहे. त्यामुळे यूआयडीएआयने त्याबाबत योग्य त्या मार्गाने  युक्तीवाद करावा. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर खटले भरण्यापेक्षा त्यांनी सिस्टीम सुधारण्यावर भर द्यावा, असं स्नोडेन म्हणाला.

तुमचे हक्क, माहिती सुरक्षितता किंवा तुमच्या प्रायव्हसीची चिंता करु नका, असं सरकार सांगत असलं, तरी तीच मोठी फसवणूक आहे.  ही जर्मनीच्या गोबेल्स नीतीशी नातं सांगणारं आहे, असा आरोपही स्नोडेनने केला.

भारतात आज जिकडे तिकडे आधार नंबर मागितला जातो. आधारशिवाय एकही काम होत नाही.  त्यामुळे तुमचा आधार नंबर सर्वत्र पसरत असल्यामुळे हळूहळू तुम्ही प्रत्येक ठिकाणी अडकत आहात, असं स्नोडेनने नमूद केलं.

संबंधित बातम्या 

गुगलच्या चुकीमुळेच तुमच्या मोबाईलध्ये ‘UIDAI’चा नंबर  

तुमच्या मोबाईलमध्ये 'UIDAI' नावाचा नंबर सेव्ह झालाय का?  

आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नका : UIDAI  

आधार हॅक करणं अशक्य, शर्मा यांचा डेटा सुरक्षित, UIDAI चं स्पष्टीकरण