मुंबई : पुरुषांपेक्षा भारतीय महिला स्मार्टफोन जास्त वापरतात असं एका सर्व्हेतून समोर आलं आहे. बुधवारी हा सर्व्हे उघड झाला आहे. यात भारतीय महिला पुरुषांपेक्षा जास्त स्मार्टफोन वापरत असल्याचं तसंच युट्यूबवरचे व्हिडीओ पाहात असल्याचं समोर आलं आहे. भारतीय महिला गेम खेळण्यातही अग्रेसर असल्याचंही हा सर्व्हे सांगतो.
मोबाईल मार्केटिंग असोशिएशननं हा सर्व्हे केला आहे. यात सरासरी दिवसातून तीन तास स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 2015च्या तुलनेत 55 टक्क्यांनी वाढली आहे. यात सोशल मीडिया अप्स वापरण्यात महिला आघाडीवर असल्याचं सिद्ध झालं आहे. महिलांनी पुरुषांच्या तुलनेत दुप्पट युट्यूब आणि गेम्स खेळल्याचं सर्व्हेमधून पुढे आलं आहे. तसंच पुरुषांपेक्षा महिला 80 टक्के जास्त फेसबुक वापरतात, असंही सर्व्हेतून स्पष्ट झालं आहे.
ऑनलाईन शॉपिंगमध्ये महिलांची 15 टक्के जास्त संख्या आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रापेक्षाही ऑनलाईन शॉपिंगचा आवाका मोठा आहे. रिपोर्टमध्ये फीचर फोन वापरणाऱ्या महिला आपल्या मोबाईलवरील नेट प्लॅनसाठी जास्तीचे पैसे मोजत असल्याचं स्पष्ट झालं आहे.