नवी दिल्ली : स्नॅपडीलवर ग्राहकांना आता वस्तूंसोबतच पैसे देखील ऑर्डर करता येणार आहेत. स्नॅपडीलने होम डिलिवरी एटीएम ही सेवा सुरु केली असून याअंतर्गत 2 हजार रुपये घरी आणून दिले जाणार आहेत.
या सेवेची विशेषता म्हणजे पैसे ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला कोणतीही वस्तू घेण्याची गरज नाही. पैसे ऑर्डर करताना एक रुपया एवढा कन्विनियंस चार्ज लागणार असून हा चार्ज तुम्हाला अॅपच्या वॉलेटमधूनही देता येईल.
एटीएममधून ग्राहकांना स्नॅपडीलला पैसे द्यावे लागतील. स्नॅपडील अॅपच्या माध्यमातून तुमच्या भागात पैसे आहेत, की नाही, हे तुम्हाला समजणार आहे. कॅश असल्यास युझर्सना एक नोटिफिकेशन आणि मेसेज येईल. त्यानंतर ऑर्डर पेजवर जाऊन 2 हजार रुपये ऑर्डर करता येतील.
डिजिटल इकॉनॉमीकडे वळण्याच्या दृष्टीने ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन ही सेवा सुरु केली आहे, असं कंपनीचे सहसंस्थापक रोहित बंसल यांनी सांगितलं.
बंगळुरु आणि गुडगाव या दोनच शहरात ही सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र येत्या काळात देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये या सेवेचा विस्तार सुरु करण्यात येईल.