जीवघेणा ब्ल्यू व्हेल गेम तातडीने हटवा, केंद्र सरकारचे आदेश
एबीपी माझा वेब टीम | 15 Aug 2017 01:37 PM (IST)
भारतात ब्ल्यू व्हेल गेममुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गेमची आणि संबंधित लिंक तातडीने हटवावी, अशी सूचना केंद्र सरकारने सर्व सोशल साईट्सला केली आहे.
नवी दिल्ली : जीवघेण्या ब्ल्यू व्हेल गेमची लिंक तातडीने हटवावा, असे केंद्र सरकारने गुगल, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, याहू आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना दिले आहेत. ब्ल्यू व्हेल गेमच्या चॅलेंजमुळे भारतात अनेक ठिकाणी मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईतही अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे या गेमवर बंदी आणावी, अशी मागणी देशभरातून केली जात होती. ब्ल्यू व्हेल गेममुळे भारतात अनेक आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तुमच्या इंटरनेट प्लॅटफॉर्मवरुन या गेमची किंवा त्यासंबंधित लिंक तातडीने हटवावी, असं पत्र इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या इंटरनेट कंपन्यांना पाठवलं आहे. कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या आदेशानंतर संबंधित कंपन्यांना गेम हटवण्यासंबंधित सूचना करण्यात आली. ब्ल्यू व्हेल गेममुळे 130 मुलांची आत्महत्या? स्मार्टफोनच्या जगात ऑनलाईन गेम हा अनेकांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. अनेकजण फावल्या वेळेत कँण्डी क्रश, पोकेमॉन गो यासारखे गेम खेळताना आपल्याला दिसून येतात. पण काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या एका गेममुळे शेकडो मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा गेम खेळत असताना मुलं अक्षरश: निराशेच्या गर्तेत जातात. त्यामुळेच शेवटी ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. ‘ब्ल्यू व्हेल’ गेम हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खेळला जातो. असं सांगितलं जात आहे. ‘ब्ल्यू व्हेल’ या गेममुळे आतापर्यंत रशियातील 130 मुलांनी आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र, तेथील स्थानिक पोलिसांनी या आत्महत्यांचा ब्ल्यू व्हेलशी थेट संबंध नसल्याचं म्हटलं आहे. काय आहे ‘ब्ल्यू व्हेल’ गेम? हा गेम खेळणं सुरु केल्यानंतर तुम्हाला एक ‘मास्टर’ मिळतो. हाच मास्टर तुम्हाला म्हणजचे यूजर्सला पुढचे 50 दिवस कंट्रोल करतो. तो यूजरला दररोज एक टास्क देतो. यातील अनेक टास्क असे असतात की, ज्यामध्ये यूजरला स्वत:च्या शरीराला त्रास द्यायचा असतो. उदा. स्वत:च्या रक्तानं ब्ल्यू व्हेल तयार करणं, दिवस-दिवसभर हॉरर सिनेमा पाहणं आणि रात्रभर जागणं. यासारखे विचित्र टास्क पूर्ण करत असताना अनेक मुलं नैराश्याच्या गर्तेत जातात. या खेळात 50व्या दिवशी खेळणाऱ्या यूजरला जीव देऊन विजेते व्हाल असं सांगितलं जातं. अनेक शाळांमधून आता पालकांना या जीवघेण्या गेमबाबत माहिती दिली जात असून आपल्या मुलांना त्यापासून दूर ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे. आतापर्यंत हा गेम भारतात लाँच करण्यात आलेला नाही. पण इंटरनेटनं जगाला फार जवळ आणलं आहे. त्यामुळे अशा जीवघेण्या खेळापासून तुमच्या मुलांना दूर ठेवा. संबंधित बातम्या :