नवी दिल्ली: मारूती सुझुकी पाठोपाठ हुंदाई मोटर्सनेही आपल्या कारच्या किंमतीत वाढ केली आहे. हुंदाईने आपल्या सर्व मॉडेलच्या किंमतीत 3000 ते 20,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. हे वाढीव दर 16 ऑगस्ट 2016 पासून लागू होणार आहेत.
कच्च्या मालाच्या किमतीत वाढ, आणि आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयांच्या किमतीत अवमुल्यन झाल्याने कंपनीने कारच्या किंमतीत वाढ करण्याचा हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानंतर हुंदाईच्या हॅचबॅक कारमधील इयॉन आणि आय 10च्या किमतीत 3000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर देशातील सर्वात महाग कार प्रिमियम एसयूव्ही सेंटा-फेच्या किंमतीत 20,000नी वाढ केली आहे.
हुंदाई चालू वर्षी दोन नव्या कार बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. यातील नवीन एलांट्रा आणि एलीट आय-20चे अॅटोमॅटिक व्हॅरिएंटचाही समावेश आहे. या दरवाढीमुळे बाजारात नव्या येणाऱ्या कारच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या देशांतर्गत बाजारपेठेत हुंदाईच्या आय-10, एलीट आय-20 आणि क्रिटाच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या कारची मागणी पाहता दरवाढीचा विक्रीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.