मुंबई: एचटीसीचा HTC10 हा स्मार्टफोन भारतात उद्या लाँच होण्याची शक्यता आहे. एचटीसीने उद्या राजधानी दिल्लीत होणाऱ्या इव्हेंटसाठी प्रसारमाध्यमांना निमंत्रणेही पाठवलीत, मात्र उद्याच्या इव्हेंटमध्ये कोणता स्मार्टफोन लाँच होणार हे मात्र जाहीर केलेलं नाही. एचटीसी 10 हा एचटीसीचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 या प्रोसेसरने सज्ज असलेला एचटीसी 10 हा स्मार्टफोन जागतिक पातळीवर एप्रिल महिन्यातच लाँच झाला आहे. मात्र भारतीय गॅझेटप्रेमींना त्यासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागली आहे.
जगभरात एचटीसी 10 हा स्मार्टफोन लाँच झाला असला तरी भारतात एचटीसीने एचटीसी 10 चं लाईफस्टाईल हे व्हर्जन लाँचिंगसाठी लिस्ट केलंय. HTC10 लाईफस्टाईल व्हर्जनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 652 हा प्रोसेसर आहे.
भारतात तुलनेने कमी क्षमतेचा एचटीसी 10 स्मार्टफोन लाँच केल्याबद्धल एचटीसीविरोधात सोशल मीडियावर बरीच ओरड झाल्यानंतर, एचटीसीकडून असं जाहीर करण्यात आलं की जगभरात जे व्हर्जन लाँच झालं, तेच व्हर्जन भारतातही लाँच होईल.
एचटीसीने आयोजित केलेल्या उद्याच्या इव्हेंटमध्ये नेमका कोणता स्मार्टफोन लाँच करणार हे अजून गुलदस्त्यात ठेवलं असलं तरी जाणकारांना मात्र एचटीसी 10 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन किंवा दोन्ही व्हेरीएंट्स लाँच होतील असं जाणकारांना वाटतं.
एचटीसी 10 हा स्मार्टफोन गूगलच्या लेटेस्ट अँड्राईड 6.0 मार्शमेलो या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. या स्मार्टफोनची रॅम 4 जीबी असून स्क्रीन डिस्प्ले 5.2 इंचांचा क्वाड एचडी सुपर एलसीडी 5 म्हणजे (1440x2560 पिक्सेल) आहे. या स्मार्टफोनचा प्रोसेसर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 820 म्हणजे सर्वाधिक लेटेस्ट आहे.
एचटीसी 10 चा मुख्य म्हणजे रिअर कॅमेरा 12 अल्ट्रा पिक्सेल लेझर ऑटो फोकस सुविधेसह, ड्युअल टोल एलईडी फ्लॅशने सज्ज आहे. त्याशिवाय ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन आणि बीएसआय सेन्सर ही सर्व हायइन्ड स्मार्टफोन कॅमेऱ्यात असलेल्या सुविधा एचटीसी 10 मध्येही असतील.
एचटीसी 10 चा फ्रंट म्हणजे सेल्फी कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे. त्यामध्येही ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन आणि बीएसआय सेन्सर या सुविधा आहेत.
मेमरी स्टोरेजच्या बाबतीत सांगायचं तर एचटीसी 10 32जीबी आणि 64जीबी क्षमतेमध्ये उपलब्ध आहे. त्याशिवाय एसडी मेमरी कार्डद्वारे स्टोरेज क्षमता 2टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
एचटीसी 10 स्मार्टफोनची बॅटरी 3000 mAh क्षमतेची आहे. हा स्मार्टफोन ग्लेसियर सिल्व्हर आणि कार्बन ग्रे अशा दोन रंगात उपलब्ध आहे.