मुंबई : दमदार आणि स्टायलिश बाईक बनवणारी कंपनी रॉयल एन्फिल्डला लवकरच नवा प्रतिस्पर्धी मिळण्याची शक्यता आहे. होंडा आता पॉवरफुल बाईक सेगमेंटमध्ये उतरणार आहे. कंपनीसाठी हा एक प्रयोग आहे, ज्यात थेट रॉयल एन्फिल्ड त्यांची प्रतिस्पर्धी असेल.
आता सीबीआरपेक्षा एक पाऊल पुढे जात होंडा अशी बाईक आणणार आहे, जी दिसायला मोठी असेल, त्यासोबतच पॉवरफुलही असेल. एशियन होंडा मोटर्स कंपनी लिमिटेडचे संचालक नोरिअक आबे यांच्या माहितीनुसार, "कंपनीने या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी नवी टीम स्थापन केली आहे. या टीममध्ये थायलंड आणि जपानच्या निवडक तज्ज्ञांचा समावेश आहे, ज्यांना भारतात येऊन बाईक डिझाईन करण्यास सांगितलं आहे.
"जर कंपनीने भारतात याचं उत्पादन केलं, तर त्यांची जपानमध्येही निर्यात केली जाईल," असंही नोरिअक आबे यांनी सांगितलं.
होंडाजवळ आधीपासूनच 300-500 सीसीमध्ये दो बाईक (रिबेल 300 आणि रिबेल 500) आहेत. अमेरिकन बाजारात या बाईक मागील अनेक काळापासून वापरात आहेत. आता पॉवरफुल बाईक आणून रॉयल एन्फिल्डला टक्कर कशी देता येईल, यावर कंपनींचं लक्ष आहे.
2016-17 वर्षात रॉयल एन्फिल्डने 5.92 लाख युनिटपेक्षा जास्त विक्री केली. तर 13,819 युनिटची निर्यात केली. मात्र, जाणकारांच्या मते, रॉयल एन्फिल्डला मात देणं होंडासाठी सोपं नसेल. रॉयल एन्फिल्डच्या 'हिमालयन' बाईकचे ग्राहक भारतातच नाही तर परदेशातही पसरले आहेत.