होंडानं तब्बल 1 लाख 90 हजार कार परत मागवल्या!
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2016 04:13 PM (IST)
मुंबई: होंडा कंपनीनं तब्बल 1 लाख 90 हजार कार परत मागवल्या आहेत. एअर बॅगच्या दुरूस्तीसाठी कंपनीनं कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. कार मालकाकडून एकही रूपया न घेता एअर बॅग दुरूस्त किंवा बदली करून दिल्या जाणार आहेत. ज्या कार परत मागवल्या आहेत, त्यामध्ये होंडा सिटी, जाझ, ऍकोर्ड, सिव्हीक आणि सीआरव्ही या मॉडेलचा समावेश आहे. कारमालक जवळच्या होंडा सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन कंपनीच्या स्किमचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, गेल्या दोन वर्षात होंडा कंपनीनं अशा प्रकारे सात वेळा कार परत मागवल्याचा प्रकार घडला आहे. कंपनी सीआर-व्ही आणि सिव्हीक या कारची सर्वात आधी एअरबॅग दुरुस्ती करणार आहे. इतर मॉडेलच्या एअरबॅग दुरुस्तीचं काम सप्टेंबर 2016 पर्यंत सुरु राहणार आहे.