पुणे: गुगलवर एखाद्या शहराचं नाव टाकताच तुम्हाला त्या शहराची इत्तंभूत माहिती मिळते. मात्र गुगल ट्रान्सलेटरवर तुम्ही हिंजेवाडी असं टाकलं तर, "ते घरी परतले नाहीत" असं भाषांतर पाहायला मिळतं. त्यामुळे हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.


 

या खोडसाळपणामुळं पिंपरी- चिंचवडसह राज्यभरातून याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जगाच्या नकाशावर 'आयटी हब' म्हणून ओळखली जाणारी हिंजवडी, वाहतूक कोंडी तसेच हिंजवडी की हिंजेवाडी या नावाच्या वादाने नेहमी चर्चेत असायची. आता त्याला जोड मिळाली आहे ती या नव्या चर्चेची.
हिंजवडीमधील वाहतूक कोंडीमुळे एखाद्या अभियंत्याने हा खोडसाळपणा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या खोडसाळपणामुळं हिंजवडीची बदनामी होऊ लागल्याने हिंजवडीकर संतप्त झाले आहेत. त्यामुळं त्यांनी सरकारसह गुगलला याकडे लक्ष देऊन, ही माहिती हटविण्याची मागणी केली आहे.

 

याशिवाय या आयटी हबमध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांनीदेखील तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

 

यामुळं केवळ हिंजवडीची नव्हे तर आयटी हबची जगात नाचक्की झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नोकऱ्यांवरदेखील होऊ शकतो असंही स्थानिकांनी व्यक्त केलं आहे.

 

प्रभावी ठरणाऱ्या व्हॉट्सअपवर ही माहिती आधीच व्हायरल झाली आहे. त्यामुळं 'आयटी हब'ला या खोडसाळपणाची जोड कायम राहिली, तर जगाच्या नकाशावर हिंजवडीची नवी ओळख निर्माण व्हायला उशीर लागणार नाही, तेव्हा वेळीच या खोडसळपणावर आवर आणण्याची गरज आहे.