मुंबई : आधार कार्ड अनिवार्य केल्यामुळे सध्या गोपनीय माहितीबद्दल सुप्रीम कोर्टापासून ते सर्वसामान्यांपर्यंत चर्चा आहे. यातच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे चेअरमन आर एस शर्मा यांनी स्वतःचा आधार क्रमांक शेअर करुन ते हॅक करुन दाखवण्याचं आव्हान दिलं.

फ्रान्सच्या एका हॅकरने शर्मा यांचं हे आव्हान स्वीकारलं आणि थेट त्यांच्या आधार क्रमांकाशी लीक असलेला मोबाईल नंबरच ट्विटरवर जाहीर केला.


''तुमचा पत्ता, जन्मतारीख आणि फोन नंबर आधार क्रमांकाद्वारे मिळवला जाऊ शकतो. तूर्तास इथेच थांबतो. आधार क्रमांक सार्वजनिक करणं किती धोकादायक आहे ते तुम्हाला आता तरी कळलं असेल,'' असं ट्वीट एलियट एल्डर्सन याने केलं.


आधारचा डेटाबेस भक्कम असून कुणीही तो हॅक करु शकत नाही. आधारची माहिती गोपनीयच आहे, असा दावा नेहमीच केला जातो. आर. एस. शर्मा यांनीही असाच दावा केला आणि स्वतःचा आधार क्रमांक शेअर केला. एल्डर्सन याने काही तासातच आधार नंबरशी लिंक असलेला फोन नंबरच ट्विटरवर शेअर करत हे आव्हान स्वीकारलं.

विशेष म्हणजे एल्डर्सन या हॅकरने जो नंबर शेअर केला, तो शर्मा यांचा नाही, असंही त्याने सांगितलं. कारण, तो फोन नंबर शर्मा यांच्या सचिवांचा असल्याचाही पुरावा त्याने शेअर केला.

दरम्यान, हा हॅकर एवढ्यावरच थांबला नाही. त्याने जो मोबाईल नंबर शोधला, त्या नंबरने सुरु असलेल्या व्हॉट्सअॅप अकाऊंटचा डीपीही काढून दिला. शिवाय शर्मा आणि हॅकर यांच्यात यावरुन दावे-प्रतिदाव्याचा खेळही रंगला. शिवाय शर्मा यांना ट्वीटर युझर्सनेही अनेक प्रश्न विचारले.

यानंतर शर्मांनी पुन्हा ट्वीट केलं. ''तू सांगतोयस तेवढा चांगला हॅकर नाहीस. या माझ्या आधारशी सर्व बँक अकाऊंट लिंक आहेत. ते तू काढू शकलेला नाहीस.. आणि काढले तरी काय?'' असा टोला शर्मा यांनी लगावला.