मुंबई : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला बुधवारी जोरदार झटका बसला. अवघ्या दोन तासात त्याची संपत्ती 16.8 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 1153 अब्ज रुपयांनी कमी झाली. डेटा सुरक्षेबाबत या सोशल मीडिया कंपनीवर सातत्याने निशाण्यावर आहे. याचा परिणाम आता कंपनीचं उत्पन्न आणि मार्क झुकरबर्गच्या एकूण संपत्तीवरही दिसायला लागला आहे.


कंपनीने बुधवारी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचा युझर बेस वाढत नसून त्यामध्ये फारच घसरण झाली आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी डेव्हिड वेहनर यांनीही सांगितलं की, आगामी दिवसातही यात वाढ दिसण्याची शक्यता कमी आहे.

फेसबुकने वॉल स्ट्रीटला याची माहिती देताच कंपनीचे शेअर जोरदार आपटले. कंपनीच्या शेअर्समध्ये 24 टक्क्यांनी कपात झाली आहे. यामुळे मार्क झुकरबर्गची संपत्ती 1153 अब्ज रुपयांनी घटली आहे.

जर फेसबुकच्या शेअर्समध्ये आजही घसरण झाली तर झुकरबर्गला आणखी नुकसान सहन करावं लागू शकतं. ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार त्याच्या संपत्तीत 13.7 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 940 अब्ज रुपयांनी कपात होऊ शकते. परिणामी मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत कपात होऊन 70 अब्ज डॉलरवर पोहोचेल.