गुरुग्राम : पत्नीसाठी आयफोन 7 भेट देण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करणं एका व्यक्तीला महागात पडल्याची घडना गुरुग्राममध्ये घडली आहे. पतीने आनंदाने पत्नीला बॉक्स दिला, पण त्यातील सामान पाहून पत्नी बुचकळ्यात पडली. या बॉक्समध्ये चार्जर, इयर फोन, फोन कव्हरसह सगळ्या अॅक्सेसरीज होत्या, पण फोनऐवजी रिन साबणाची वडी होती.
पतीने तातडीने सोसायटीच्या गेटवर पोहोचलेल्या डिलिव्हरी बॉयला सुरक्षारक्षकाच्या मदतीने पकडलं. यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकारानंतर कंपनीने त्याच्या अकाऊंटमध्ये फोनची संपूर्ण रक्कम जमा केली.
प्रिस्टेन इस्टेट सोसायटीमध्ये राहणाऱ्या राजीव जुल्का यांच्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर रोजी पत्नीला गिफ्ट देण्यासाठी अमेझॉन या शॉपिंग वेबसाईटवर त्यांनी आयफोन-7 फोन बुक केला होता. याची किंमत 44 हजार 900 रुपये होती. फोनच्या बुकिंगवेळी त्यांनी पैसेही भरले होते. दोन दिवसांनंतर त्यांना मेसेज आला की, त्यांच्या फोनची आजच डिलिव्हरी होणार आहे. आशिष नावाचा तरुण फोनची डिलिव्हरी करेल. मेसेजमध्ये डिलिव्हरी बॉयचा मोबाईल नंबरही आला .
यानंतर रविवारी दुपारी चारच्या सुमारास डिलिव्हरी बॉय फोन घेऊन आला. त्यानंतर सोसायटीमध्ये फोनचा बॉक्स दिला. राजीव यांनी बॉक्स उघडल्यावर त्यांना झटकाच बसला. त्यात फोनऐवजी रिन साबणाची वडी होती, तर चार्जर, इयर फोन, फोन कव्हर आणि इतर वस्तू मात्र व्यवस्थित होत्या. राजीव यांनी तातडीने सुरक्षारक्षकाच्या मदतीने डिलिव्हरी बॉयला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
पोलिसांनी डिलिव्हरी बॉयची चौकशी केली. त्याचसोबत अमेझॉनच्या अधिकाऱ्यांनाही बोलावलं. अमेझॉनने डीएलएफ एरियामध्ये जी फोर एसला डिलिव्हरीचं काम दिलं होतं. बंगळुरुहून मानेसर वेअर हाऊसमध्ये त्यांचं सामान येतं. यानंतर डीएलएफ टूमध्ये डिलिव्हरी होते.
अकाऊंटमध्ये रक्कम जमा झाल्यानंतर तक्रारदाराने तक्रार मागे घेतली, अशी माहिती सेक्टर-53 पोलिस स्टेशनचे इन्चार्ज अरविंद कुमार यांनी दिली.