मुंबई: देशात 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंतच्या कर व्यवस्थेतील हा सर्वात मोठा बदल असणार आहे. देशभरात वस्तू आणि सेवांवर यापुढे फक्त एकच टॅक्स असणार आहे. जीएसटीमध्ये सरकारनं वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी वेगवेगळे टॅक्स स्लॅब ठेवले आहेत.
जर टेलिकॉम इंडस्ट्रीचा विचार केला तर जीएसटीमुळे टेलिकॉम सेक्टर महाग होणार आहे. कारण की, टेलिकॉम सेक्टरसाठी केंद्र सरकारनं 18 टक्के टॅक्स स्लॅब निश्चित केला आहे. सध्या टेलिकॉमवर 15 टक्के टॅक्स लागतो. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रात सध्या नाराजी आहे.
टेलिकॉम क्षेत्र पहिल्यापासूनच अडचणीत असताना अशावेळी सरकारनं यावर 18 टक्के स्लॅब ठेवल्यानं या क्षेत्रातील अडचणीत भर पडली आहे. पण कंपन्या आपल्यावरील या टॅक्सचा हा भार यूजर्सवरच टाकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात एंट्री केल्यापासून सर्व मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी अनलिमिटेड कॉलिंग सुरु केलं आहे. तसेच डेटाच्या किंमतीतही कपात केली आहे. अशावेळी टॅक्सचे दर वाढल्यानं या क्षेत्रासाठी अडचणीचं ठरु शकतं.
पोस्टपेड यूजर्सचा विचार केल्यास त्यांना जीएसटी महाग पडणार आहे. जर एखाद्या यूजरचं बिल आतापर्यंत 1000 रुपये येत असेल तर जीएसटी लागू झाल्यानंतर यामध्ये 30 रुपये आणखी वाढणार आहेत. त्यामुळे तुम्हाला 1030 रुपये बिल भरावं लागणार आहे. तर कंपन्या प्रीप्रेड यूजर्सला कमी टॉकटाईम देऊ शकतात. एका वृत्तानुसार, 1 जुलैपासून सर्व टॉकटाइम ऑफर देणाऱ्या वाउचरवर कंपन्या 18 टक्के जीएसटी लागू करणार आहे. त्यामुळे फुल टॉकटाइम मिळणाऱ्या प्लानवर कमी टॉकटाइम मिळू शकतं.
अनलिमिटेड कॉलिंगशिवाय व्होडाफोन, एअरटेल, आयडिया यासारख्या कंपन्या फ्री अॅडिशनल डेटाही देत आहेत. सध्या एअरटेल आणि व्होडाफान आपल्या ग्राहकांसाठी फ्री डेटा देत आहेत. त्यामुळे 1 जुलैपासून टेलिकॉम इंडस्ट्री नेमकं काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.