व्हॉट्सअ्ॅपवर पाठवण्यात येणारे मेसेज कोणी पाठवले हे शोधण्याकरिता केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला मेसेज पाठवण्यासाठी 'फिंगर प्रिंट' अनिवार्य करण्यासंबंधित सूचना दिल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हॉट्सअॅपवरुन पाठवण्यात येणाऱ्या फेक मेसेजेसला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून त्यांच्या कार्यप्रणालीत वारंवार बदल करण्यात येत आहेत. मात्र आता येत्या काळात व्हॉट्सअॅपवरुन मेसेज पाठवण्यासाठी फिंगरप्रिंट अनिवार्य होण्याची शक्यता आहे.


फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग कंपनीचे जगभरात 150 कोटी पेक्षा अधिक युजर्स आहेत. भारतातही व्हॉट्सअॅपचे जवळपास 35 ते 40 कोटी युजर्स आहेत. मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठवण्यासाठी व्हॉट्सअ्ॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. त्यामुळे एखादा मेसेज सर्वात आधी कोणी पाठवला आणि किती जणांनी तो फॉरवर्ड केला आहे याचा शोध घेण्यासाठी व्हॉट्सअॅपला फिंगरप्रिंट अनिवार्य करण्यासंबंधी विचारणा करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांत व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेल्या मेसेजमुळे अफवा पसरवल्या गेल्या आणि हिंसाचाराच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी व्हॉट्सअॅपवरुन मुलं चोरणाऱ्या टोळीबाबत अफवा पसरवण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकारकडून व्हॉट्सअ्ॅपला वारंवार सूचना देण्यात येत आहेत.

सरकारकडून करण्यात आलेली सुचना व्हॉट्सअॅपने मान्य केल्यास भविष्यात तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मेसेज, फोटो, व्हीडिओ किंवा इतर कोणताही कन्टेट पाठवायला असेल, तर सर्वात आधी फिंगर प्रिंट सिस्टमद्वारे तुमची ओळख पटवावी लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारे मेसेज नेमके कोणी पाठवायला सुरुवात केली आहे हे  शोधणं शक्य होणार आहे.