नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रातील जायंट मानल्या गूगल कंपनीकडून भारतातील अँड्रॉईड अॅप डेव्हलपर्ससाठी खुशखबर आहे. देशातील जवळपास 20 लाख अँड्रॉईड अॅप डेव्हलपर्सना गूगलकडून प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

 

भारतात आजच्या घडीला जवळपास 10 लाख लोक अँड्रॉईड अॅपशी संबधित काम करतात. 2018 साली अँड्रॉईड अॅप डेव्हलपर्सची संख्या 40 लाखांवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. त्यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठं अॅप डेव्हलपर्सचं केंद्र असणार आहे.

 

गूगलचे उपाध्यक्ष (प्रॉडक्ट मॅनेजमेंट) सेनगुप्ता यांनी याबाबत सांगितले, “अमेरिकेला मागे सोडत 2018 पर्यंत भारत जगातील सर्वात मोठं डेव्हलपर केंद्र बनणार आहे. 2018 पर्यंत भारतात जवळपास 40 लाख अॅप डेव्हलपर्स असतील. विशेष म्हणजे यातील जवळपास 25 टक्के डेव्हलपर्स केवळ मोबाईलसाठी काम करत असतील.”

 

सेनगुप्ता म्हणाले, “आम्ही अँड्रॉईड फंडामेंटल्सवर एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे. सर्व सरकारी, खासगी विश्वविद्यापीठं आणि राष्ट्रीय कौशल्य विकास प्राधिकरणाच्या प्रशिक्षण केंद्रावरुन लवकरच प्रशिक्षण दिलं जाणार आहे.”