मुंबई : गुगल भारतीय स्मार्टफोन युझर्सना लवकरच एक खुशखबर देण्याची तयारी करत आहे. भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये पाय रोवण्यासाठी गुगल पिक्सेलचे स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. अॅपल, सॅमसंग यांसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी गुगल हे पाऊल उचलणार आहे.


‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, गुगल सध्या मिड-रेंज पिक्सेल स्मार्टफोनवर काम करत आहे. हे स्मार्टफोन यावर्षी जुलै-ऑगस्टपासून भारतात लाँच केले जाऊ शकतात. भारतीय बाजारात पाय रोवण्यासाठी गुगल खास धोरण आखत आहे. ज्यामध्ये, पिक्सेलबुकसारखे अनेक फोन भारतात येऊ शकतात.

या महिन्यात गुगल स्मार्ट स्पीकर भारतात लाँच करणार आहे. या डिव्हाईसची टक्कर अमेझॉनच्या स्मार्ट स्पीकरशी होईल. गुगल होम आणि गुगल होम मिनीचे दोन व्हेरिएंट लाँच केले जातील, ज्याची किंमत 9 हजार 999 रुपये आणि 4 हजार 499 रुपये असेल. गुगल होम गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात आला होता, जो आता भारतातही उपलब्ध होईल.

हा स्मार्ट स्पीकर गुगल व्हॉईस असिस्टंटसह येईल, विशेष म्हणजे गुगल व्हॉईस असिस्टंट हिंदी भाषेलाही सपोर्ट करणार आहे. या डिव्हाईसवर गाणी वाजवण्याव्यतिरिक्त व्हॉईस कमांड टास्क, बातम्या, अलार्म, रिमाईंडर असे फीचर्सही मिळणार आहेत.