गुगलने आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक गैरवर्तनाबाबतच्या तक्रारींसाठी एक विशेष वेबसाईट लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेबसाईटवर गैरवर्तनाबाबतच्या तक्रारी सोप्या पद्धतीने करता येणार आहेत. गुगलच्या डाइवर्सिटी, इक्वीटि एंड इंक्ल्यूजन विभागाच्या ग्लोबल डायरेक्टर मिलोनी पार्कर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गुगलच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अडचणी थेट आणि सोप्या पद्धतीने मांडता याव्यात यासाठी नवी वेबसाईट बनवली असल्याचे मिलोनी पार्कर यांनी सांगितले. गुगल कर्मचाऱ्यांसाठीची ही वेबसाईट जून महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जगभरातील जवळपास वीस हजार गुगल कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या गैरवर्तनावरुन आंदोलन केले होते. त्यानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी घोषणा केली होती की, लैंगिक छळ आणि हिंसा याबाबतच्या तक्रारींबाबत कंपनी ठोस पाऊल उचलेल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना कोर्टात जावं लागणार नाही.
या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून गुगलच्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणारा त्रास थेट मांडता येणार आहे. गुगल त्यांच्या व्हेंडर्स आणि हंगामी कर्मचाऱ्यांबाबतही अशाच प्रकारची यंत्रणा उभी करणार आहे.
गुगलचा कर्मचाऱ्यांशी संबंधित एक अंतर्गत वार्षिक अहवाल देखील नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यंदाच्या या अहवालात कंपनीतील लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींचीही माहिती देण्यात आली आहे. नोव्हेंबरमधील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर गुगलकडून गैरवर्तनाबाबतच्या तक्रारींवर कारवाईसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.
गुगल कर्मचाऱ्यांना गैरवर्तनाबाबतच्या तक्रारींसाठी कंपनीची नवीन वेबसाईट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Apr 2019 09:10 AM (IST)
गुगलने आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींसाठी एक विशेष वेबसाईट लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -