मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त गुगलनेही खास डूडल तयार करुन बाबा आमटेंना व त्यांच्या कार्याला सलाम केला आहे. बाबांचे समाजकार्य आणि त्यांनी कृष्ठरोग्यांची केलेली सेवा या डूडलमधून पहायला मिळत आहे.

बाबांचे मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंघणघाट येथे झाला. लहानपणापासून त्यांच्यावर रविंद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळेच ते समाजकार्यात अग्रेसर होते.

बाबांना एके दिवशी एक कुष्ठरोगी माणूस दिसला. हातपाय झडलेले, भर पावसात भिजत असलेला तो माणूस पाहून त्यांनी त्याची सेवा केली. पण तो जगू शकला नाही. त्यानंतर त्यांनी कृष्टरोग्यांसाठी कार्य करायचे ठरवले. त्यांच्या पत्नी साधना आमटे यांनीही त्यांना या कामात साथ दिली. त्यानंतर बाबांनी 'आनंदवन' आश्रम उभारला.

भारत जोडो आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलनात बाबांचा सहभाग होता. त्याशिवाय वन्यजीव संरक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. बाबा आमटे यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आशियातील नोबेल मानला जाणारा रेमन मॅगसेसे पुरस्कारही बाबांना मिळाला आहे. तसेच पद्मश्री, पद्मविभूषण, गांधी शांतता पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.