शेर-ओ-शायरीच्या बादशाहला गूगलचा सलाम
एबीपी माझा वेब टीम | 27 Dec 2017 08:26 AM (IST)
संपूर्ण आयुष्य एका संघर्षाच्या उन्हातच त्यांनी घालवलं. आर्थिक संकटांनी तर त्यांना बेजार केलं. मात्र जगण्यातले चटकेही त्यांनी शब्दबद्ध केले. शायरीतून व्यक्त केले.
मुंबई : शेर-ओ-शायरीचा बादशाह अर्थात मिर्जा गालिब यांची आज 220 वी जयंती आहे. हे निमित्त साधत जगप्रसिद्ध सर्च इंजिन गूगलने खास डूडल तयार करुन मिर्जा गालिब यांना अभिवादन केलं आहे. मुघलकालीन भिंती, त्यावरील आकर्षक रचना, सूर्य आणि पिवळसर प्रकाश अशा पार्श्वभूमीवर मिर्जा गालिब यांचं पूर्ण चित्र असे अत्यंत मनमोहक या डूडलचे स्वरुप आहे. "मैं नादान था जो वफ़ा को तलाश करता रहा ग़ालिब यह न सोचा के एक दिन अपनी साँस भी बेवफा हो जाएगी" उर्दू आणि पारसी भाषेतून अशा असंख्य शायरी लिहून अवघ्या जगाला भुरळ पाडणाऱ्या मिर्जा गालिब यांची आज जयंती आहे. 27 डिसेंबर 1797 रोजी आग्र्यातील काळा महालमध्ये गालिब यांचा जन्म झाला. तेव्हा भारतात मुघलांचे राज्य होते. मिर्जा असदुल्लाह बेग खान असे गालिब यांचे पूर्ण नाव. अत्यंत हालाखीच्या स्थितीत त्यांच बालपण गेलं. संपूर्ण आयुष्य एका संघर्षाच्या उन्हातच त्यांनी घालवलं. आर्थिक संकटांनी तर त्यांना बेजार केलं. मात्र जगण्यातले चटकेही त्यांनी शब्दबद्ध केले. शायरीतून व्यक्त केले. लहान असतानाच गालिब यांचं पितृछत्र हरपलं. त्यानंतर त्यांची काकांनी त्यांना सांभाळलं. मात्र त्यांचा आधारही त्यांना फार काळ मिळाला नाही. वयाच्या 13 व्या वर्षी उमराव बेगम यांच्या विवाह झाला आणि ते दिल्लीत आले. त्यानंतरचं संपूर्ण आयुष्य दिल्लीतच गेलं. मुघल काळातील शेवटचा सत्ताधारी बहादुर शाह जफर याच्या दरबारात कवी म्हणूनही ते राहिले. इश्क, मोहब्बत, वफा, लफ्ज... अशा असंख्य शब्दांमधून जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या गालिब यांचं निधन वयाच्या 71 व्या वर्षी म्हणजे 15 फेब्रुवारी 1869 रोजी दिल्लीतील चांदनी चौक भागातील गली कासिम जानमध्ये झालं. आता या भागाला 'गालिब की हवेली' म्हटलं जातं. भारत-पाकिस्तानसह अवघ्या जगातील शायरीप्रेमींना दैवतासमान असलेल्या या शब्दांच्या जादूगाराला त्याच्याच शब्दात अभिवादन करुन शेवट करावा वाटतो : "आ ही जाता वो राह पर 'ग़ालिब' कोई दिन और भी जिए होते" गूगलचं मिर्जा गालिब यांच्यावरील ट्वीट : https://twitter.com/GoggleDoddle/status/945735004214218752