मुंबई : महिला कतृत्वाचा, तिच्या जिद्दीचा आणि तिच्या सशक्तीकरणाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो.  म्हणून जगभरातील प्रत्येक महिला सन्मानार्थ गुगलने खास जागतिक महिला दिन विशेष डुडल बनवून महिलांना अनोखं गिफ्ट दिलं आहे.

गुगलनं जगभरातील 13 प्रसिद्ध महिलांचे प्रेरणादायी मेसेज देत महिलांप्रति असलेला आदर व्यक्त केला आहे. गुगलनं 13 स्लाइडच्या माध्यमातून 13 वेगवेगळ्या भाषांमध्ये हे प्रेरणादायी मेसेज दिले आहेत. यात भारताची बॉक्सर मेरी कोमचाही समावेश आहे.



जपान, अमेरिका, भारत, जर्मनी, मॅक्सिको, ब्राझील, रशिया मधील विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या महिलांचा समावेश डुडलमध्ये करण्यात आल्या आहे. लेखक, अंतराळवीर, डॉक्टर, खेळाडू अशा विविध महिलांचे प्रेरणादायी मेसेज यात आहेत.

महिला दिनानिमित्त आज जगभरात विविध कार्यक्रम आयोजित करून महिलांचा सन्मान केला जातो. विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन गौरवही होतो. संयुक्त राष्ट्रानं 1975मध्ये 8 मार्च हा जागतिक महिला दिन असल्याची घोषणा केली होती.