Khashaba Dadasaheb : सर्च इंजिन गूगलनं (Google) नुकतेच एक खास डूडल (Google Doodle)  तयार केले आहे.  कुस्तीगीर खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांची आज  97वी जयंती आहे. यानिमित्तानं गूगलनं खास डूडल तयार करुन त्यांना अभिवादन केलं आहे. गूगलच्या या खास डूडलनं अनेकांचे लक्ष वेधले. 


खाशाबा जाधव यांचा जन्म 15  जानेवारी 1926 रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला. खाशाबा जाधव यांनी त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील कामगिरीनं भारताचं नाव जगभरात उंचवलं. खाशाबा यांचे वडील दादासाहेब जाधव हे ख्यातनाम पैलवान  होते. जेव्हा खाशाबा हे  5 वर्षाचे होते, तेव्हापासूनच त्यांचे वडील त्यांना कुस्तीबाबत मार्गदर्शन देत होते. केडी (KD) आणि पॉकेट डायनामो या टोपणनावाने देखील खाशाबा जाधव ओळखले जात होते.  त्यांच्या 97व्या जयंतीनिमित्त गूगलनं खास डूडल तयार केलं आहे. गूगलच्या या डूडलमध्ये कुस्तीचा आखाडा दिसत आहे. तसेच खाशाबा जाधव यांचे चित्र देखील या डूडलमध्ये दिसत आहे. 


पाहा डूडल-






1948 मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशाबांची निवड झाली तेव्हा ते सहाव्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोहचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते.  1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे भारताला स्वातंत्र्योत्तर काळात मिळालेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं. 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता.  


1955 मध्ये खाशाबा जाधव हे महाराष्ट्र पोलीस दलात ते सब-इन्स्पेक्टर या हुद्दयावर भरती झाले. तेथे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्‌स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलीस खात्यात 27 वर्षे नोकरी केली आणि असिस्टंट पोलीस कमिशनर या हुद्द्यावरून निवृत्त झाले.  1984 मध्ये एका अपघातात खाशाबा जाधव यांचे निधन झाले. 2001 मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


पाकिस्तानी लोकांना 'पद्मश्री', मात्र देशाला पहिलं पदक मिळवून देणारा उपेक्षित : रणजित जाधव