मुंबई: नाशिकमध्ये जन्मलेल्या महिलेचा गुगलने यथोचित सन्मान केला आहे. गुगलने भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर कार्नेलिया सोराबजी यांचं खास डूडल साकारलं आहे.


कॉर्नेलिया सोराबजी यांची आज 151 वी जयंती आहे. त्याच निमित्ताने गुगलने डूडलद्वारे त्यांना सलामी दिली.

कॉर्नेलिया सोराबजी यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1866 रोजी नाशिकमध्ये पारशी कुटुंबात झाला. सोराबजी या समाजसुधारक होत्याच, शिवाय त्या ख्यातनाम लेखिकाही होत्या.

कॉर्नेलिया सोराबजी यांच्या नावे अनेक विक्रम आहेत.

त्या भारत आणि लंडनमध्ये कायद्याचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. शिवाय तत्कालिन बॉम्बे युनिव्हर्सिटीतून पदवीधर होणारी पहिली महिला होती. तसंच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत कायदे अभ्यास करणारी पहिली महिला, ब्रिटीश युनिव्हर्सिटीत कायदे अभ्यास करणारी पहिली भारतीय महिला असे अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत.

कॉर्नेलिया सोराबजी यांना त्यांच्या पालकांची उत्तम साथ लाभली. त्यांच्या पालकांनी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी पुण्यात शाळाही सुरु केल्या.

त्याच प्रेरणेतून त्यांनी स्वत:च्या मुलीला त्यावेळी उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

सोराबजी 1892 मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी परदेशात गेल्या. शिक्षण पूर्ण करुन 1894 मध्ये त्या भारतात परतल्या.

त्याकाळी महिलांना वकिली करण्याचा अधिकार नव्हता. विदेशातून कायद्याचं शिक्षण घेऊन आलेल्या सोराबजी यांनी त्याविरोधात आवाज उठवला. त्यांनी महिलांना कायदेशीर सल्ले देण्यास सुरुवात केली आणि कालांतरानं महिलांना वकिली व्यवसायाची दारं खुली करून दिली.

महिलांना वकिली करण्यापासून रोखणारा कायदा बदलण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. अखेर 1924 मध्ये तो अन्यायी कायदा रद्द करण्यात आला.

1907 मध्ये कॉर्नेलिया सोराबजी यांनी बंगाल, बिहार, ओदिशा आणि आसाममधील कोर्टात सहाय्यक महिला वकील म्हणून काम पाहिलं.

कॉर्नेलिया सोराबजी 1929 मध्ये हायकोर्टातील वरिष्ठ वकील म्हणून सेवानिवृत्त झाल्या.

1954 मध्ये  88 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मात्र कायदे क्षेत्रात त्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं.