खरगपूर : गुगलचे सीईओ असलेल्या सुंदर पिचाई यांना जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गुगल करण्याची गरज भासली नाही. आयआयटी खरगपूर या आपल्या विद्यानगरीत तब्बल 23 वर्षांनी पाऊल ठेवताच पिचाईंना कॉलेजचे दिवस आठवत गेले आणि सध्याच्या विद्यार्थ्यांसमोर त्यांनी आपला प्रवास उलगडला. 'दीपिका पदुकोण माझी आवडती अभिनेत्री आहे. विराट कोहलीचा मी चाहता आहे' असं सुंदर पिचाईंनी गप्पा मारताना सांगितलं.

चेन्नईत लहानाचे मोठे झालेले पिचाई आयआयटी खरगपूरमध्ये दाखल झाले. 'त्यावेळी कोणीही अबे साले अशी हाक मारायचं. मला हिंदी फारसं यायचं नाही आणि ही एकमेकांना हाक मारण्याची पद्धत आहे, असा माझा समज झाला. एकदा मेसमध्ये मी मोठ्याने 'अबे साले' असं ओरडलो. सगळीकडे शांतता पसरली. नंतर माझ्या लक्षात आलं की ही भाषा योग्य नाही' अशा किश्श्यांनी सुंदर पिचाईंच्या गप्पांना सुरुवात झाली.

आयआयटी खरगपूरमध्ये गेल्यावर पहिल्यांदा कॉम्प्युटर पाहिल्याचंही सुंदर यांनी सांगितलं. 'आयआयटीत प्रवेश मिळवणं कठीण होतं. मी क्लासेस बंकही करायचो. तो प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे', असं सुंदर यांनी डोळा मारत सांगितलं. 'मी रात्री उशिरापर्यंत जागायचो, आणि सकाळी लेक्चर चुकवायचो' अशी आठवण पिचाईंनी सांगितली. अभ्यासक्रमातील शिक्षण तितकंसं महत्त्वाचं नसल्याचंही पिचाई म्हणाले.

सुंदर आणि त्यांची पत्नी अंजली यांची भेटही खरगपूरच्या कॅम्पसमध्येच झाली. 'अंजलीला भेटणं तितकंसं सोपं नव्हतं, मुलींच्या हॉस्टेलमध्ये जाणं कठीण होतं. कोणीतरी बाहेरुन ओरडायचं, 'अंजली, सुंदर तुला भेटायला आलाय...' त्यामुळे प्रायव्हसीचा प्रश्नच येत नाही' ही आठवण सुंदर यांनी आवर्जून सांगितली.

गुगलचे सीईओ म्हणजे अभ्यासू कीडा असा एखाद्याचा समज असू शकेल, मात्र आपण कॉफी विथ करण आवडीने पाहतो, असं पिचाईंनी सांगितलं. 'दीपिका पदुकोण माझी आवडती अभिनेत्री आहे. विराट कोहलीचा मी चाहता आहे' असंही सुंदर म्हणाले.

कोण आहेत सुंदर पिचाई?

2015 मध्ये ऑगस्ट महिन्यात सुंदर पिचाई यांची गुगलच्या सीईओपदी वर्णी लागली. पिचाई हे टेक वर्ल्डमधील मोठं नावं आहे. सुंदर पिचाई मागील बारा-तेरा वर्षांपासून गूगलमध्ये काम करत आहे. पिचाई हे गूगलच्या अँड्रॉईड, क्रोम आणि अप्स डिव्हिजनचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट होते. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलपमेंटमध्ये सुंदर पिचाई यांची महत्त्वाची भूमिका होती.

पिचाई यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनीअर होते, तर सुंदर पिचाई यांना लहानपणापासूनच गॅझेट्सची आवड होती. इतकंच नाही तर सुंदर पिचाई हे त्यांच्या शाळेच्या क्रिकेट संघाचे कर्णधारही होते.

जन्म –

– सुंदर पिचाई यांचं जन्म चेन्नईमध्ये 1972 मध्ये झाला होता आणि आता ते 45 वर्षांचे आहेत.

–  त्यांचं खरं नाव पिचाई सुंदराजन आहे. पण त्यांना सुंदर पिचाई नावानेच ओळखलं जातं

– सुंदर पिचाई 2004 मध्ये गूगल जॉईन केलं होतं. त्यावेळी ते प्रोडक्ट आणि इनोव्हेशन ऑफिसर होते.

शिक्षण-

– पिचाई यांना पेन्सिलव्हानिया यूनिव्हर्सिटीमध्ये सायबेल स्कॉलर नावाने ओळखलं जात होतं.

– पिचाई यांनी त्यांची इंजिनीअरिंगची पदवी आयआयटी, खडगपूरमधून घेतली आहे. ते बॅचमधील सिल्वर मेडलिस्ट होते.

– अमेरिकेतील स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये सुंदर यांनी एमएसचं शिक्षण पूर्ण केलं तर वॉर्टन यूनिव्हर्सिटीमधून एमबीए केलं.

संबंधित बातम्या :


नरेंद्र मोदींची लवकरच भेट व्हावी: सुंदर पिचाई


दोन खोल्या, टीव्ही नसलेलं घर ते गुगलचा सम्राट


मोठी पदं सांभाळून जगात दबदबा निर्माण करणारे भारतीय


भारतात जन्मलेले सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ