मुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोबाईल विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2017 मध्ये पहिल्या तीन महिन्यात स्मार्टफोनच्या विक्रीत 11 टक्क्यांनी वाढ झाल्याचं एका रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.
2016 साली पहिल्या तीन महिन्यात जागतिक बाजारपेठेत स्मार्टफोनच्या विक्रीत 2 टक्क्यांनी घट झाली होती. मार्केट रिसर्च कंपनी काऊंटरपॉईंटच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.
4G/एलटीई नेटवर्क आणि गीगाबीट एलटीई नेटवर्कमुळे ही वाढ झाली असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
2016 या वर्षात स्मार्टफोनच्या विक्रीत वेगाने घट झाली होती. मात्र यावर्षी स्मार्टफोनच्या विक्रीत आणखी 6 ते 8 टक्क्यांनी वाढ होईल, असं काऊंटरपॉईंटचे संशोधक जेफ फील्डहॅक यांनी म्हटलं आहे.
पहिल्या तीन महिन्यात झालेली एकूण 73 टक्के विक्री केवळ 10 स्मार्टफोन ब्रँड्सची झाली आहे. यामध्ये ओप्पो, व्हीव्हो आणि सॅमसंगच्या ए सीरिजच्या परवडणाऱ्या स्मार्टफोनचा समावेश आहे.
या 10 ब्रँड्सपैकी 3 ब्रँडची विक्री एकूण बाजाराच्या विक्री दरापेक्षा अधिक आहे. ज्यामध्ये हुआवे, ओप्पो आणि व्हिव्हो यांचा समावेश आहे, असं रिपोर्टचे विश्लेषक शोभित श्रीवास्तव यांनी सांगितलं.
या ब्रँड्सने सॅमसंग आणि अॅपलच्या स्मार्टफोन विक्रीवर परिणाम झाला असल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.