नवी दिल्ली : मुकेश अंबानींनी रिलायन्स जिओ सेवा सप्टेंबरमध्ये लॉन्च केली. सुरुवातील जिओच्या इंटरनेट स्पीडबाबत ग्राहकांकडून काही तक्रारी येत होत्या. मात्र, आता जिओच्या इंटरनेट स्पीडने विक्रमाची नोंद केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात जिओ भारतातील सर्वात वेगवान 4G नेटवर्क म्हणून नोंद झाली आहे आणि आता मार्चमध्येही जिओचं 4G नेटवर्क सर्वात जास्त स्पीड असणारं ठरलं आहे. मार्चमध्ये जिओचा इंटरनेट स्पीड 18.48 Mbps एवढा नोंदवला गेला आहे.
रिलायन्स जिओने एअरटेल, व्होडाफोन, आयडिया या टेलिकॉम कंपनींना मागे टाकत सर्वात वेगवान इंटरनेट स्पीडचा पुरस्कार मिळवला. ट्रायच्या रिपोर्टनुसार रिलायन्स जिओने 18.48 Mbps स्पीडसह सर्वाधिक वेगवान डाऊनलोड स्पीडही आपल्या नावावर केला.
इंटरनेट स्पीडवर जिओ पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर एअरटेल आणि तिसऱ्या क्रमांकावर व्होडाफोन, तर चौथ्या क्रमांकावर आयडिया आहे.
याआधी फेब्रुवारीमधील ट्रायच्या रिपोर्टनुसार, जिओचं डाऊनलोड स्पीड 16.48mbps होतं. त्याचवेळी भारती एअरटेलचा इंटरनेट स्पीड कमी झाल्याचेही ट्रायच्या रिपोर्टमधून समोर आले आहे.
टेलिकॉम रेग्युलेटर अर्थात ट्राय स्पीडटेस्ट अॅप आणि डेस्कटॉप व्हर्जनच्या माध्यमातून नेटवर्क स्पीडची नोंद करते. मात्र, ही नोंद अचूक आहे, असे म्हणता येत नाही. कारण विशिष्ट नेटवर्कमध्ये स्पीड कमी-जास्त होण्याची शक्यताही असते.