आता फ्लिपकार्टवरुन प्रॉडक्ट खरेदीसाठी कर्ज मिळणार?
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2016 06:55 AM (IST)
मुंबई : देशातील सर्वात मोठी ऑनलाईन मार्केटप्लेस फ्लिपकार्ट 'बिग बिलियन डे' इव्हेंटमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. ऑक्टोबरमध्ये 'बिग बिलियन डे' सेल सुरु होणार असून, प्रॉडक्ट खरेदीसाठी ग्राहकांना फ्लिपकार्टकडून कर्जही उपलब्ध करुन दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. फ्लिपकार्टच्या 'बिग बिलियन डे' सेलचं हे तिसरं वर्ष आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फ्लिपकार्टने ग्राहकांना प्री-अॅप्रूव्ह्ड कर्ज देण्यासाठी फायनान्शियल इन्स्टिट्यूट्सोबत चर्चाही सुरु केली आहे. त्याचवेळी 'बाय नाऊ, पे लेटर' स्कीम आणण्याची तयारी फ्लिपकार्ट करत आहे. सणांचे दिवस ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्ससाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे फ्लिपकार्टने जोरदार तयारी सुरु केली आहे. फ्लिपकार्टने याआधी 15-16 ऑक्टोबरला बिग बिलियन डेची योजना आखली होती. मात्र, आता ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी किंवा पहिल्याच आठवड्यात सेल सुरु केला जाणार आहे, अशी माहिती मिळते आहे. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे सेलची सर्वांनाच उत्सुकता असते. त्यामुळे यंदा फ्लिपकार्ट कोणत्या नव्या ऑफर्स जाहीर करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.