मुंबई: फ्लिपकार्ट कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष सचिन बन्सल यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही, हे कारण देत त्यांना पदावरून दूर केलं आहे. शुक्रवारी बंगळुरुमध्ये झालेल्या मासिक बैठकीनंतर त्यांना पदावरून हटवण्याचा हा निर्णय झाला.
सचिन बन्सल आणि कंपनीचे सहसंस्थापक बिनी बन्सल यांनी 2007 मध्ये फ्लिपकार्टची सुरुवात केली. कंपनीने सचिन बन्सल यांची जानेवारी महिन्यात कंपनीचे सीईओ आणि सहसंस्थापक बिनी बन्सल यांच्या जागी नेमणूक केली होती. सचिन बन्सल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने चांगली कामगिरी केली होती. कंपनीमध्ये त्यांची एक उत्तम रणनीतीकार म्हणून ओळख होती.
गेल्या काही महिन्यात कंपनीने कामगारांच्या कामगिरीचे परीक्षण करून 300 जणांना कामावरून कमी केले होते. त्यानुसारच, सचिन बन्सल यांचीही कामगिरी चांगली नसल्याने त्यांना पदावरून दूर करण्यात आलं.
मात्र, गेल्या महिन्यात त्यांची कामगिरी चांगली नसल्याचे कारण देत, त्यांना कंपनीने पदावरून दूर केलं आहे. दरम्यान कंपनीने त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होईल याबाबत स्पष्ट केले नाही.