नवी दिल्लीः जगभरात सॅमसंग गॅलक्सी नोट 7 च्या बॅटरी स्फोटाच्या घटना समोर येत असताना गॅलक्सी नोट 2 ला विमानात आग लागल्याची घटना घडली आहे. सिंगापूरहून चेन्नईला येत असलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात लँडिंगवेळी अचानक गॅलक्सी नोट 2 ने पेट घेतला. केबिन क्रूच्या सतर्कतेने ही आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली.


डीजीसीएकडून सॅमसंगला समन्स

आगीच्या घटनेनंतर ही माहिती डीजीसीए म्हणजे विमान वाहतूक प्राधिकरणाला देण्यात आली.  नोट सीरिजचा कोणताही मोबाईल विमान प्रवासात असताना सतर्कता बाळगण्याचा सल्ला डीजीसीएने एका सूचनेद्वारे दिला आहे. शिवाय घटनेनंतर सॅमसंगला समन्सही बजावण्यात आलं आहे.

इंडिगो एअरलाईन्सची प्रतिक्रिया

विमानात 23 नंबरवर बसलेल्या प्रवाशाच्या बॅगेतून धूर निघत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर तातडीने ही घटना केबिन क्रूला कळविण्यात आली. त्यामुळे आग लगेच विझवण्यात यश आलं. घटनेत मालमत्तेचं कसलंही नुकसान झालं नाही, असं स्पष्टीकरण इंडिगो एअरलाईन्सने दिलं आहे.